OLA Shakti: ओला इलेक्ट्रिकने आज, 16 ऑक्टोबर रोजी त्यांचं एनर्जी प्रोडक्ट 'ओला शक्ती' बाजारात आणले आहे. हे कंपनीचे पहिले बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम (BESS) आहे, जे थेट घरे, फार्म आणि लहान व्यवसायांसाठी डिझाइन केले आहे. ओलाच्या मते, हे उत्पादन भारतातील ऊर्जा वापराला नवीन परिभाषा देईल. कारण आता विजेचा वापर मोबाईलप्रमाणे पोर्टेबल आणि ऑन-डिमांड करता येणार आहे. कंपनीचे उद्दिष्ट आहे की, पुढील काही वर्षांत BESS चा वार्षिक वापर 5 GWh पर्यंत पोहोचेल.
'ओला शक्ती' काय आहे?
ओलाच्या मते, 'ओला शक्ती' कंपनीच्या 4680 Bharat Cell तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मवर तयार केले गेले आहे, जे पूर्वी इलेक्ट्रिक वाहनांसाठी विकसित केले होते. आता त्याच तंत्रज्ञानाचा उपयोग ऊर्जा साठवण प्रणाली म्हणून केला जात आहे. हे उत्पादन पूर्णपणे भारतात डिझाइन, तयार आणि उत्पादित केले आहे. म्हणजेच हे 100% स्वदेशी ऊर्जा उत्पादन आहे.
ओला इलेक्ट्रिकचे अध्यक्ष आणि एमडी भाविश अग्रवाल यांनी या प्रसंगी सांगितले की, "भारतात ऊर्जेची कमतरता नाही, तर ऊर्जा साठवण्याची गरज आहे. 'ओला शक्ती'च्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घराला ऊर्जा स्वातंत्र्य मिळवून देत आहोत. हे केवळ तंत्रज्ञान नाही, तर एक चळवळ आहे."
'ओला शक्ती'ची वैशिष्ट्ये
'ओला शक्ती' एक पूर्णपणे मॉड्यूलर प्रणाली आहे, जी गरजेनुसार स्केल करता येते. तिच्या कॉम्पॅक्ट डिझाइनमुळे तिचे इंस्टॉलेशन आणि देखभाल करणे सोपे आहे. कंपनीचा दावा आहे की, यात 98% पर्यंत ऊर्जा कार्यक्षमता आहे आणि हे ऑटोमोटिव-ग्रेड सुरक्षा मानकांवर आधारित आहे. हे सिस्टम IP67 रेटेड आहे, म्हणजेच धुळीपासून आणि पाणी किंवा पावसाच्या वातावरणातही हे पूर्णपणे सुरक्षित राहील. यातून वीज गेल्यावरही विजेचा पुरवठा त्वरित सुरू होईल.
कोणत्या उपकरणांसाठी वापर होणार?
'ओला शक्ती' एसी, फ्रिज, पंप, इंडक्शन कुकर आणि नेटवर्क डिव्हाइसेस यांसारखी उपकरणे चालवण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. वापरकर्ते अॅपच्या माध्यमातून रिअल-टाइममध्ये या सिस्टीमचे नियंत्रण करू शकतात. तसेच, हे सिस्टम स्वतःच वापराची पद्धत शिकून ऊर्जेचा वापर ऑप्टिमाइज करेल आणि स्मार्ट रिपोर्ट्स देईल, ज्यामुळे वीज आणि खर्च दोन्हीची बचत होईल.
'ओला शक्ती'ची किंमत
- ओला शक्ती चार व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आले आहे.
- 1kW / 1.5kWh: 29,999 रुपये
- 1kW / 3kWh: 55,999 रुपये
- 3kW / 5.2kWh: 1,19,999 रुपये
- 6kW / 9.1kWh: 1,59,999 रुपये
बुकिंग कुठे आणि कधीपासून करता येणार?
बुकिंग आजपासून (16 ऑक्टोबर) 999 रुपयांमध्ये सुरू झाली आहे. याची डिलिव्हरी 2026 च्या मकर संक्रांतीपासून सुरू होईल. हे उत्पादन ओला इलेक्ट्रिकच्या वेबसाइटवर आणि ओला स्टोअरमध्ये उपलब्ध असेल.