Palam Kalyanasundaram Inspiring Story: सुपरस्टार रजनीकांत समाजासाठी सामान्य असणाऱ्या माणसासमोर हात जोडून उभे राहिले आणि म्हणाले, "मला तुम्हाला वडिलांचा दर्जा द्यायचा आहे...". ही कोणतीही फिल्मी गोष्ट नाही. ही कहाणी आहे पालम कल्याणसुंदरम यांची. आयुष्यभर त्यांनी असे नेमके काय केले की सुपरस्टार रजनीकांत सुद्धा त्यांना आपले वडील बनवू इच्छित होते? जाणून घेऊया त्यांची प्रेरणादायी कहाणी...
आईचा एक मंत्र आणि आयुष्याचा अनोखा संकल्प
तमिळनाडूच्या एका छोट्याशा मेलकरिवेलमकुलम गावात जन्मलेल्या कल्याणसुंदरम यांच्या डोक्यावरून बालपणीच वडिलांचे छत्र हरपले. आईने एकटीने त्यांचा सांभाळ केला. आई नेहमी सांगायची, "बाळा, जितकं मिळवून जगशील, त्याने फक्त पोट भरेल. पण जे आहे ते वाटून जगशील, तीच तुझी खरी ओळख बनेल." आईची ही शिकवण कल्याणसुंदरम यांच्या मनात घर करून गेली. अभ्यासात हुशार असलेले कल्याणसुंदरम 'लायब्ररी सायन्स'मध्ये गोल्ड मेडलिस्ट बनले आणि त्यांना शासकीय महाविद्यालयात ग्रंथपाल (लायब्रेरियन) म्हणून नोकरी मिळाली.
पहिला पगार मिळाला अन् हैराण करणारा निर्णय घेतला
हातात पहिला पगार येताच कल्याणसुंदरम यांनी असा एक निर्णय घेतला, जो ऐकून संपूर्ण महाविद्यालय अवाक झाले. त्यांनी जाहीर केले की ते आपल्या पगारातील एक-एक पैसा अनाथ आणि गरीब मुलांच्या शिक्षणावर खर्च करतील. 35 वर्षांच्या नोकरीदरम्यान त्यांनी आपला 100 टक्के पगार गरजू आणि अनाथ आश्रमांना दान केला
स्वतःचे पोट कसे भरले?
आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी ते रात्री एका स्थानिक हॉटेलमध्ये वेटर आणि सफाई कर्मचारी म्हणून काम करायचे. दिवसा महाविद्यालयात ग्रंथपाल आणि रात्री हॉटेलमध्ये वेटर. वर्ष 1962 मध्ये भारत-चीन युद्धादरम्यान जेव्हा पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी रेडिओवरून देशवासीयांना मदतीचे आवाहन केले, तेव्हा हा 22 वर्षांचा तरुण थेट तमिळनाडूचे मुख्यमंत्री के. कामराज यांच्याकडे पोहोचला. त्यांच्याकडे स्वतःची 65 ग्रॅमची एकमेव सोन्याची साखळी होती, ती त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता 'नॅशनल डिफेन्स फंड'मध्ये दान केली.
30 कोटी रुपयांचे बक्षीसाचंही गरिबांमध्ये केलं वाटप
वर्ष 1998 मध्ये जेव्हा ते निवृत्त झाले, तेव्हा त्यांना पेन्शन आणि फंड मिळून सुमारे 10 लाख रुपये मिळाले. त्यांनी ती पूर्ण रक्कमही ताबडतोब दान करून टाकली. यानंतर एका अमेरिकन संस्थेने त्यांची 'मॅन ऑफ द मिलेनियम' म्हणून निवड केली आणि 30 कोटी रुपयांचे रोख बक्षीस दिले. कल्याणसुंदरम यांनी त्यातील एक रुपयाही स्वतःसाठी ठेवला नाही आणि संपूर्ण रक्कम गरिबांच्या नावे केली. जेव्हा कोणी विचारले की तुम्ही एवढे मोठे बक्षीस का नाकारले, तेव्हा ते हसून म्हणाले, "हॉटेलमध्ये काम करून माझा उदरनिर्वाह आरामात होतो. जेव्हा या जगातून जाऊ, तेव्हा सोबत काय घेऊन जाणार? सर्व काही इथेच राहून जायचे आहे."
(नक्की वाचा: Salman Khan Post: शाहरुख किंवा आमीर नव्हे या सुपरस्टारला सलमान खानने म्हटले 'बडा भाई', शेअर केले खास फोटो)
रजनीकांत यांनी दिला वडिलांचा दर्जा
वर्ष 2012 मध्ये जेव्हा सुपरस्टार रजनीकांत यांना कल्याणसुंदरम यांच्याबाबत माहिती मिळाली, तेव्हा ते इतके भावुक झाले की त्यांनी सार्वजनिकरीत्या त्यांना आपल्या वडिलांचा दर्जा दिला. रजनीकांत यांनी त्यांना आपल्यासोबत महालात राहण्याची विनंती केली, पण कल्याणसुंदरम यांनी प्रेमाने ती नाकारत सांगितले, "अजून माझे काम संपलेले नाही." भारत सरकारने वर्ष 2023 मध्ये त्यांना प्रतिष्ठित 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित केले.
कहाणीत आला एक ट्विस्ट
आज वयाच्या 84-85 व्या वर्षीही ते रात्रंदिवस गरिबांची सेवा करत आहेत. पण सर्वात भावुक करणारी गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या मृत्यूनंतरही सर्व काही दान केले आहे. त्यांनी आपले डोळे आणि संपूर्ण शरीर तिरुनेलवेली मेडिकल कॉलेजला संशोधनासाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच जो माणूस हयात असताना आपला प्रत्येक श्वास इतरांच्या नावे करत राहिला, तो या जगातून गेल्यानंतरही कोणाच्या-न्-कोणाच्या कामी येईल. कल्याणसुंदरम यांचे आयुष्य आपल्याला शिकवते की इतरांना मदत करण्यासाठी खिशापेक्षा मोठे मन असणे गरजेचे आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world