Pithori Amavasya 2025 Date And Time: श्रावण महिन्यातील अमावस्येला पिठोरी अमावस्या किंवा दर्श अमावस्या असे म्हणतात. या दिवशी बैल पोळा सण देखील साजरा केला जातो. पिठोरी अमावस्येच्या दिवशी 64 योगिनींच्या मूर्ती तयार करून त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे. श्रावणाच्या शेवटच्या दिवशी (Shravan Amavasya 2025) येणारी ही अमावस्या मातृदिन म्हणूनही ओळखली जाते. पिठोरी अमावस्येला 64 योगिनींची पूजा केली जाते, 64 योगिनी म्हणजे उपजीविकेसाठी उपयुक्त 64 कला आहेत, त्याचीच हे प्रतिक मानले जातात. या योगिनींची पूजा केली जाते आणि पिठाच्याच पदार्थांचे नैवेद्य अर्पण केले जातात. यंदा पिठोरी अमावस्या कधी आहे, तिथी कालावधी काय आहे, पूजा कशी करावी, पौराणिक कथा इत्यादी सर्व माहिती जाणून घेऊया...
पिठोरी अमावस्या तिथी | Pithori Amavasya 2025 Tithi
22 ऑगस्ट 2025 शुक्रवार सकाळी 11.56 वाजता अमावस्या तिथीस सुरुवात होत आहे.
23 ऑगस्ट 2025 शनिवारी सकाळी 11.37 वाजता अमावस्या तिथी समाप्त होत आहे.
पिठोरी अमावस्येचे व्रत कसे करावे? | Pithori Amavasya Vrat Vidhi
- प्रत्येक कुटुंबातल्या विवाहित महिलांनी पिठोरी अमावस्येचे व्रत करण्याचा प्रयत्न करावा.
- संध्याकाळी घर स्वच्छ करून धूपअगरबत्ती लावून दिवा प्रज्वलित करावा.
- प्रवेशद्वार, देव्हारा, तुळशी वृंदावनाजवळही दिवे प्रज्वलित करावे.
- 64 योगिनी (देवी) घरच्या देव्हाऱ्यात स्थानापन्न झाल्या आहेत, असे समजून त्यांची पिठाच्या दिव्यांनी आरती करावी.
- दूध, खीर, पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करावा.
- घरामध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचे स्वागत करावे, त्यांनाही खीर, पुरणपोळी खायला द्यावी.
- कुटुंबीयांसोबत प्रसादाचे भोजन करुन उपवास सोडावे.
पिठोरी अमावस्येची पूजा कशी करावी | Pithori Amavasya 2025 Puja Vidhi
- पहाटे उठून स्नान करावे.
- सूर्यदेवतेला जल अर्पण करावे. यानंतर पितरांनाही जल अर्पण करावे.
- पितरांना जल अर्पण करताना "ॐ पितृभ्यः नमः" या मंत्राचा जप करावा.
- स्वच्छ वस्त्र परिधान करुन पूजेची तयारी करावी.
- तुपाचा दिवा प्रज्वलित करुन व्रताचे संकल्प करावे.
- मान्यतेनुसार विधीवत पूजा केल्यास मुलांच्या आयुष्यात नेहमीच आनंद राहतो, असे म्हणतात.
(नक्की वाचा: Rudraksha Benefits: रुद्राक्षचे पाणी प्यायल्यास काय होते? तज्ज्ञांनी सांगितले जबरदस्त फायदे)
पाच कणकेच्या दिव्यांचा उपाय
- पिठोरी अमावस्येला व्रत करणे शक्य नसेल तर घरामध्ये पाच कणकेचे दिवे नक्की प्रज्वलित करावे.
- घराचे प्रवेशद्वारे, देव्हारा, तुळशी वृदांवन, घराचा ईशान्य आणि दक्षिण दिशेला हे दिवे ठेवावे.
- कणकेच्या दिव्यांचा उपाय केल्यास जीवनातील अडचणी दूर होण्यास मदत मिळेल.
11 दिव्यांनी मुलांना का ओवाळावे?
- पिठोरी अमावस्या आई आणि मुलाबाळांसाठी अतिशय महत्त्वाची असते.
- मुलांच्या दीर्घायुष्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी, संरक्षणासाठी या दिवशी उपाय केले जातात.
- पिठोरी अमावस्येच्या दिवशी कणकेचे 11 दिवे तयार करुन प्रज्वलित करा.
- आपल्या मुलांना एकत्रित बसवून त्यांना ओवाळा.
पिठोरी अमावस्येचे व्रत करण्याचे फायदे | Pithori Amavasya Benefits
- पितृदोष दूर होतात, असे म्हणतात.
- जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत मिळते.
- पितरांचा आशीर्वाद मिळतो.
- कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धीचा वर्षाव होण्यास मदत मिळते.
(नक्की वाचा: 'ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:' मंत्राचा रोज सकाळी 24 मिनिटे करा जप, जीवनात होतील 5 मोठे बदल)
पिठोरी अमावस्येची कहाणी | Pithori Amavasya Katha
आटपाट नगरामध्ये एक ब्राह्मण राहत असे. त्याच्या घरी श्रावणातल्या अमावस्येच्या दिवशी बापाचे श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई? ज्या दिवशी श्राद्ध, त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सूनेचे पोट जाई. यामुळे ब्राह्मण उपाशीच जात असत. सलग सहा वर्षे असेच झाले. सातव्या वर्षीही हेच घडलं, तेव्हा सासरा सूनेवर रागावला. ते मेलेलं पोर तिच्या पदरात घातले आणि तिला रानात हाकलून लावले. पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यामध्ये गेली. तिथे तिला एक झोटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, "बाई, बाई, तू कोणाची कोण ? इथे येण्याचे कारण काय? आलीस तशी लवकर जा; नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील."
तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, "तेवढ्याचसाठी मी येथे आलेय"
तशी झोटिंगाची बायको म्हणाली, "बाई, बाई, तू जिवावर इतकी उदार का?"
"मी एका ब्राह्मणाची सून, दरवर्षी मी श्रावणी अमावस्येच्या दिवशी बाळंत होई आणि बाळ मरून जात आहे. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजेसासऱ्याचं श्राद्ध असे. माझे असे झाले म्हणजे श्राद्धाला आलेले ब्राह्मण उपाशी जात. अशी माझी सहा बाळंतपणे झाली. सातव्या खेपेलाही असेच झाले. तेव्हा सासऱ्यांना माझा राग आला. ते मला म्हणाले, "माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे सात वर्षे उपाशी राहिला. तर तू घरांतून चालती हो." असं म्हणून हे मेलेले बाळ माझ्या ओटीमध्ये घातले आणि मला घालवून दिले. नंतर मी येथे आले. आता मला जगून तरी काय करायचंय?" अस म्हणत ती रडू लागली.
तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, "बाई घाबरू नको. अशीच थोडीशी पुढे जा. तिथे तुला शिवाचे एक लिंग दृष्टीस पडेल. बेलाचे झाड लागेल. तिथे एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या साती आसरा बरोबर घेऊन तिथे पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि 'अतिथी कोण आहे' म्हणून विचारतील. असे विचारल्यावर 'मी आहे' म्हणून म्हण. त्या तुला पाहतील, कोण कोठची म्हणून चौकशी करतील, तेव्हा तू सर्व हकीकत सांग."
ब्राह्मणाच्या सूनेन बरे म्हटले. तिथून उठली, पुढे गेली. एक बेलाचे झाड पाहिले. तिथे उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली, तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले. तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्री झाली, तशी नागकन्या, देवकन्या, आसरांच्या आणि 'अतिथि कोण आहे' म्हणून विचारले. त्याबरोबर ती खाली उतरली. स्वाऱ्यासुद्धा आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखवला 'मी आहे' म्हणू म्हणाली. तेव्हा सर्वांनी मागे पाहिले. त्यांना आश्चर्य वाटले. तिची कोण कोठली म्हणून चौकशी केली. तिने सर्व हकीकत सांगितली. नागकन्या, देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली, तेव्हा आसरांनी ती दाखविली. पुढे त्यांनी तिच्या सातही मुलांना जिवंत केलं आणि तिच्याकडे सुपूर्द केले. पुढे तिला हे व्रत सांगितले. चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्युलोकी हे व्रत प्रगट करायला सांगितले.
तिने विचारले, "यामुळे काय होते?" आसरांनी सांगितलं, "हे व्रत केले म्हणजे मुलंबाळं दगावत नाहीत, सुखासमाधानांत राहतात. " पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली. ती आपल्या गावांत आली. लोकांनी तिला पाहिले. ब्राह्मणाला जाऊन सांगितलं, "भटजी, भटजी, तुमची सून घरी येत आहे." त्यांना ते खोटं वाटलं. मुलंबाळं दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सूनेला पाहिलं. तसा उठला, घरात गेला. मूठभर तांदूळ, तांब्याभर पाणी आणले. तांदूळ सुनेवरून आणि मुलांवरून ओवाळून टाकून दिले. हातपाय धुऊन घरात आला. सर्व हकीकत सूनेला विचारली. तिने सर्वकाही सांगितले. पुढे सर्वांना आनंद झाला आणि ती मुलाबाळांसुद्धा सुखाने नांदू लागली.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)