
PM Internship Scheme 2025: प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भारतातील युवा वर्गाला इंटर्नशिपच्या माध्यमातून रोजगारक्षम बनण्याच्या उद्देशाने ही संधी उपलब्ध करण्यात आलीय. इच्छुक उमेदवारांनी https://pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर 12 मार्च 2025 नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ऑक्टोबर 2024 मधील या योजनेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात एचडीएफसी बँक, आयशर, एनटीपीसी, मारुती सुझकी, आयसीआयसीआय बँक, पावरग्रीड, मणप्पुरम फायनान्स लिमिटेड, मुथूट फायनान्स, ज्युबिलन्ट अॅग्री अॅन्ड कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, इंडियन ऑइल, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड अशा भारतातील विविध मोठ्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत. याद्वारे एक लाखाहून अधिक इंटर्नशिपच्या संधी उमेदवारांना उपलब्ध आहेत.
(नक्की वाचा: Investment Tips: महिलांनी गुंतवणुकीचा ट्रेंड बदलला; शेअर बाजाराऐवजी 'या' क्षेत्रात करत आहेत गुंतवणूक)इंटर्नशिपसाठी कोणाला करता येणार अर्ज?
प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांहून कमी असणे आवश्यक आहे. तसेच वयोमर्यादा 21 ते 24 वर्षांपर्यंत असावी. इयत्ता दहावी, बारावी, आयटीआय, पदविका, पदवीधर उमेदवार पात्र असणार आहेत. तथापि, पदव्युत्तर पदवीधारक, सध्या पूर्णवेळ शिक्षण घेणारे, कौशल्य प्रशिक्षण, राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी (ॲप्रेंटिशीप) प्रोत्साहन योजना, राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी (ॲप्रेंटिशीप) प्रशिक्षण योजनेचा लाभ घेतलेले अथवा नोकरी करणारे उमेदवार यासाठी पात्र असणार नाहीत.
किती मिळणार आर्थिक साहाय्य?
उमेदवारांनी संकेतस्थळावर नोंदणी करून कमाल तीन कंपन्यांमधील इंटर्नशिपसाठी अर्ज सादर करावा. पात्र उमेदवारांना विविध कंपन्यांमध्ये 12 महिन्यांच्या इंटर्नशिपची संधी उपलब्ध होणार आहे. प्रशिक्षणार्थींना दरमहा पाच हजार रुपये आर्थिक साहाय्य तसेच सहा हजार रुपये एकरकमी प्रदान करण्यात येणार आहेत.
अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास कार्यालयास 020-26133606 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रास्ता पेठ, पुणे येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता प्र. सहायक आयुक्त सा. बा. मोहिते यांनी दिलीय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world