Pre-Season Alphonso Mangoes : कोकणातील हापूस आंब्यांची पहिली प्री-हार्व्हेस्ट आवक पुण्याच्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये आज शुक्रवारी झाली. या प्री-हार्व्हेस्ट आवकने संपूर्ण बाजाराचं लक्ष वेधून घेतलं आहे. वाढती मागणी आणि मर्यादित आवक यामुळे प्रत्येक पेटीला तब्बल 15,000 रुपये एवढा प्रीमियम दर मिळाला आहे. जैतापूर (रत्नागिरी जिल्हा) येथून मागवलेल्या या मालात चार पेट्यांचा समावेश होता. प्रत्येक पेटीत तीन डझन हापूस आंबे होते.पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) चे संचालक गणेश घुले, फळ‑भाजीपाला विभाग प्रमुख बाळासाहेब कोंडे आणि युवराज काची यांनी या पहिल्या आवकचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. त्यानंतर संपूर्ण मालाची खरेदीही त्यांनीच केली.
मुख्य हंगामात आवक वाढल्यानंतर दर स्थिरावणार
सामान्यतः मार्चपासून बाजारात रत्नागिरी हापूस आंब्यांची आवक सुरु होते.परंतु, हा माल हंगामपूर्व (प्री‑सीजन) मध्ये काढलेला असल्याने तो बाजारात लवकर उपलब्ध झाला आहे,अशी व्यापाऱ्यांची माहिती आहे. हापूससोबतच एक पेटी केसर आंब्यांची आवकही मार्केट यार्डमध्ये झाली. यावर्षी अधूनमधून काही हापूस आंब्यांच्या लवकर आवका झाल्या असल्या,तरी एकूण प्रमाण अत्यंत कमी आहे.त्यामुळे दर अजूनही कडाडलेले आहेत मुख्य हंगामात आवक वाढू लागल्यानंतर दर स्थिर होतील आणि काहीसे कमी होतील, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.
नक्की वाचा >> Pune News: छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोवर चिकटवल्या जाहिराती, शिवप्रेमींमध्ये संताप
हापूस आंब्यांची नियमित आवक कधी सुरु होणार?
आंबा व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, यंदाच्या हिवाळ्यातील अनुकूल हवामान विशेषतः दीर्घकाळ टिकलेली थंडी,यामुळे आंब्याच्या बागांमध्ये फुलोरा चांगला आला आहे. फुलोरा अधिक काळ टिकून राहिल्याने मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उत्पादन जास्त मिळेल अशी अपेक्षा आहे. हापूस आंब्यांची नियमित आवक 15 ते 20 फेब्रुवारीच्या दरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे.