Breast Cancer Nanomedicine Technology: पुण्यातील अग्रगण्य संशोधन संस्था असलेल्या आगरकर रीसर्च इन्स्टिट्यूट (एआरआय) येथील वैज्ञानिकांनी ब्रेस्ट कॅन्सरवरील उपचारासाठी अत्याधुनिक नॅनोमेडिसिन तंत्र विकसित केले आहे. या नव्या तंत्रज्ञानाद्वारे कॅन्सर वाढवणाऱ्या जनुकांना (Genes) निष्क्रिय करून ट्युमरची वाढ प्रभावीपणे रोखता येत असल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या अखत्यारीतील एआरआयच्या नॅनोबायोसायन्स गटाने विकसित केलेल्या या जैवविघटनशील (Biodegradable) नॅनोकॅरिअर प्रणालीमुळे ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशींवर अचूक लक्ष्य साधणे शक्य झाले आहे. या संशोधनाचे निष्कर्ष प्रतिष्ठित 'Advanced Healthcare Materials' या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत.
(Pune Scientists Breakthrough in Cancer Treatment; New Nanomedicine Technology Developed for Breast Cancer)
(नक्की वाचा : Iron Deficiency: वारंवार थकवा आणि चक्कर येते? शरीरात आहे या गोष्टीची कमतरता न्युट्रिशनिस्टनी सांगितली कारणं)
मेसोपोरस सिलिका नॅनोकण आणि जनुकीय उपचार पद्धती| Mesoporous Silica Nanoparticles and Genetic Therapy
या प्रगत तंत्रामध्ये विशेष प्रकारच्या मेसोपोरस सिलिका नॅनोकणांचा वापर करण्यात आला असून ते कॅन्सर पेशींमध्ये लहान हस्तक्षेपकारी आरएनए (siRNA) प्रभावीपणे पोहोचवतात. ब्रेस्ट कॅन्सर पेशींवर आढळणाऱ्या MUC1 रिसेप्टरला लक्ष्य करण्यासाठी विशेष जैवपॉलिमर आणि अॅप्टामर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. संशोधकांनी 'MCL-1' आणि 'Survivin' या कॅन्सर पेशींना जिवंत ठेवणाऱ्या दोन महत्त्वाच्या जनुकांना एकाच वेळी निष्क्रिय करण्याची अभिनव पद्धत विकसित केली आहे. त्यामुळे कॅन्सर पेशींचा नाश होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते आणि ट्युमरची वाढ लक्षणीयरीत्या कमी होते.
(नक्की वाचा : What Is Acidity: पोटात जळजळ होते? अॅसिडिटी म्हणजे काय? तुमच्या या 7 वाईट सवयी तातडीने बंद करा, अन्यथा...)
यशस्वी चाचण्या आणि संशोधक टीम| Successful Trials and the Research Team
प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये तसेच एससीआयडी (SCID) उंदरांवरील संशोधनात या तंत्रामुळे ट्युमरची वाढ प्रभावीपणे रोखली गेली. विशेष म्हणजे या उपचारादरम्यान शरीरावर होणारे दुष्परिणाम अतिशय अल्प असल्याचेही आढळून आले आहे. हे महत्त्वपूर्ण संशोधन वैज्ञानिक निलाद्री हलदार, राजकुमार सामंता, सुरजित पात्रा, देवयानी सेंगर, सचिन जाधव आणि वीरेंद्र गजबिये यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करण्यात आले. ब्रेस्ट कॅन्सरवरील पारंपरिक केमोथेरपीपेक्षा अधिक सुरक्षित, परिणामकारक आणि अचूक उपचारपद्धती विकसित करण्याच्या दिशेने हे संशोधन एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Press Information Bureau Press realease