Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यास भगवान विष्णूचा आशीवार्द मिळतो आणि आपल्यावर त्यांची कृपादृष्टी होते, असे म्हणतात. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला पुत्रदा एकादशी साजरी केली जाते. हिंदू मान्यतेनुसार मनोभावे आणि श्रद्धेने हे व्रत केल्यास आणि दुसऱ्या दिवशी पारण केल्यास ज्यांना संतती प्राप्तीची इच्छा असते, त्यांना ते सुख मिळते. तसेच निरोगी आरोग्य आणि सौभाग्य देखील मिळते, असेही म्हणतात. पुत्रदा एकादशीचे व्रत केल्यास श्री हरींसह देवी लक्ष्मीमातेचाही आशीर्वाद मिळते. पण चुकून पुत्रदा एकादशीचे व्रत सुटल्यास काय करावे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
क्षमा प्रार्थना
हिंदू धर्मानुसार हे व्रत केल्यास संततीसुख, सौभाग्य, आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळते; असे म्हणतात. पण चुकून हे व्रत सुटल्यास सर्वप्रथम स्नान करुन भगवान श्री विष्णूची क्षमा प्रार्थना करावी. शुद्ध आणि स्वच्छ अंतःकरणाने श्री हरींची प्रार्थना केली आणि क्षमा मागितली, तर भगवंत त्यांना क्षमा करतात;असेही म्हणतात.
Photo Credit: NDTV
मंत्र जप
पूजा किंवा उपवास इत्यादींमध्ये कोणतीही चूक झाल्यास या मंत्राचा जप करण्याचा नियम आहे. पुत्रदा एकादशी व्रताशी संबंधित काही चूक झाली असेल तर विशेषतः श्री हरींसमोर हात जोडून या मंत्राचा जप करावा.
"आवाहनं न जानामि न जानामि विसर्जनम्।
पूजां चैव न जानामि क्षमस्व परमेश्वर।
मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं जनार्दन।
यत्पूजितं मया देव। परिपूर्ण तदस्तु में।"
(नक्की वाचा: Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशी व्रत कधी आहे? जाणून घ्या योग्य तारीख, शुभ मुहूर्त, महत्त्व आणि पूजा विधी)
दान
हिंदू धर्मामध्ये दानधर्म करण्याचे प्रचंड महत्त्व आहे. म्हणूनच लोक इच्छा पूर्ण व्हाव्या आणि ग्रहदोषांसह सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्तता मिळावी म्हणून दान करतात. पुत्रदा एकादशीचा उपवास चुकून मोडला तर त्याचे प्रायश्चित्त करण्यासाठी एखाद्या गरजू व्यक्तीला शक्य तितके दान करावे.
नियमांचे पालन
व्रताशी संबंधित नियमांचं पालन करुन प्रायश्चित्त करावे. जास्तीत जास्त प्रमाणात 'ॐ नमो भगवते वासुदेवाय' या मंत्राचा जप करावा.
पूजा आणि पारणही करा
पुत्रदा एकादशीचा व्रत मोडल्यास तर निराश होऊ नका, पुढील एकादशीचे व्रत योग्य पद्धतीने करण्याचा संकल्प करा. यासह पूजा पूर्ण करा आणि दुसऱ्या दिवशी शुभ वेळेवर विधीवत पारण करा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)