Ram Navami Bank Holiday 2026: राम नवमीच्या निमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण असून भाविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. मात्र, याच काळात बँकेची महत्त्वाची कामे असलेल्या नागरिकांमध्ये सुट्टीबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. राम नवमीची सुट्टी नेमकी 26 मार्चला आहे की 27 मार्चला, याबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) प्रसिद्ध केलेल्या अधिकृत सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार आणि राज्य सरकारच्या निर्णयानुसार, महाराष्ट्रातील बँकांच्या सुट्टीबाबतचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रात सुट्टी नेमकी कधी?
महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूरसह सर्व शहरांमधील बँकांना 26 मार्च, गुरुवारी राम नवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे उद्या राज्यातील सर्व सार्वजनिक आणि खासगी बँकांचे कामकाज बंद राहणार आहे.
भारतातील बँकांच्या सुट्ट्यांचे नियोजन रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) मार्फत केले जाते. नियमानुसार, प्रत्येक महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार तसेच सर्व रविवारी बँकांना सुट्टी असते. या व्यतिरिक्त विविध राज्यांतील स्थानिक सण आणि सार्वजनिक उत्सवांनुसार सुट्ट्यांचे दिवस बदलू शकतात. महाराष्ट्रात राम नवमी हा मोठा सण असल्याने राज्य सरकारने या दिवशी सार्वजनिक सुट्टी घोषित केली आहे, ज्यामुळे बँकांचे प्रत्यक्ष व्यवहार उद्या बंद राहतील.
( नक्की वाचा : दक्षिण कोरियाचे 60 लाख नागरिक अयोध्याला समजतात स्वत:चं 'माहेर', वाचा काय आहे कारण? )
उत्तर प्रदेश सरकारने भाविकांची गर्दी लक्षात घेता 26 आणि 27 मार्च अशा दोन दिवसांच्या सुट्ट्या जाहीर केल्या असल्या, तरी महाराष्ट्रात मात्र केवळ 26 मार्च रोजीच बँकेला सुट्टी असेल. त्यामुळे 27 मार्च, शुक्रवारी महाराष्ट्रातील सर्व बँकांचे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
बँकेची कामे रखडणार?
बँकेच्या शाखा प्रत्यक्षरीत्या बंद असल्या तरी ग्राहकांना घाबरण्याचे कारण नाही. सध्याच्या डिजिटल युगात अनेक सेवा २४ तास उपलब्ध आहेत. राम नवमीच्या सुट्टीच्या दिवशी ऑनलाइन बँकिंग, नेटबँकिंग आणि युपीआय (UPI) सेवा पूर्णपणे कार्यरत राहतील. तसेच एटीएम (ATM) मधून पैसे काढणे किंवा ट्रान्सफर करणे, एनईएफटी (NEFT) आणि आरटीजीएस (RTGS) यांसारखे व्यवहार नेहमीप्रमाणे करता येतील.
मात्र, चेक क्लिअरन्स, रोख रक्कम भरणे किंवा प्रत्यक्ष बँकेत जाऊन करावयाची कामे उद्या होणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला 27 मार्चची वाट पाहावी लागेल.
मार्च महिन्यातील उर्वरित सुट्ट्यांचे वेळापत्रक
मार्च महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक असून या महिन्यात अजूनही काही सुट्ट्या बाकी आहेत. 26 मार्चच्या सुट्टीनंतर, 28 मार्च रोजी चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील. त्यानंतर 29 मार्चला रविवारची साप्ताहिक सुट्टी असेल.
महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 मार्चला महावीर जयंती असल्यामुळे पुन्हा एकदा बँकांच्या कामकाजाला सुट्टी असेल. त्यामुळे मार्चअखेरची महत्त्वाची कामे उरकण्यासाठी ग्राहकांनी या सुट्ट्यांचे वेळापत्रक लक्षात घेऊनच आपले नियोजन करणे सोयीचे ठरेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world