Rental Boyfriend : कधी विचार केला आहे का, की कॅब किंवा जेवण ऑनलाईन बुक करण्याप्रमाणेच एखाद्या व्यक्तीला काही तासांसाठी सोबत म्हणून बुक करता येऊ शकते? ऐकायला थोडं अजब वाटेल, पण हा केवळ विनोद उरलेला नाही. मोठ्या शहरांमध्ये सध्या एका नव्या आणि विचित्र ट्रेंडने चांगलाच जोर पकडला आहे. तुम्हाला एकट्याने चित्रपट पाहायला जायचे नसेल, शॉपिंगला सोबत हवी असेल किंवा एखाद्या पार्टीत एकटे जाणे टाळायचे असेल, तर आता तासांच्या हिशोबाने सोबती उपलब्ध करून दिला जात आहे.
काय आहे हा ट्रेंड?
या अनोख्या आणि वेगळ्या कल्पनेची सुरुवात मुळात जपानमध्ये झाली. जपानमधील धावपळीचे जीवन, लोकांमधील एकटेपणा आणि सामाजिक संवाद कमी झाल्यामुळे तिथे अशा सेवांचा व्यवसाय सुरू झाला. सुरुवातीला नातेवाईक किंवा मित्र बनवून सोबत देण्यापासून सुरू झालेला हा प्रकार हळूहळू रेंटल गर्लफ्रेंड आणि रेंटल बॉयफ्रेंडच्या रूपात जगभरात पसरला.

आता सोशल मीडियाच्या माध्यमातून हा प्रकार भारतातही पोहोचला आहे. दिल्ली-एनसीआरसह अनेक मोठ्या शहरांत फेसबुक, इंस्टाग्राम आणि काही संकेतस्थळांद्वारे ही companion service पुरवली जात आहे.
( नक्की वाचा : Rental boyfriend : भारतात तासाच्या हिशोबाने बॉयफ्रेंड मिळायला सुरुवात, रेट कार्ड आणि अटी वाचल्या का? )
प्रेमाचा व्यवहार नाही, तर फक्त काही तासांची सोबत
नाव ऐकून अनेकदा हा एखादा डेटिंग प्रकार वाटू शकतो. मात्र, या सेवा पुरवणाऱ्या मंचांचा असा दावा आहे की हा कोणताही रोमँटिक किंवा शारीरिक संबंधांचा प्रकार नाही. यात पैसे प्रेमासाठी नाही, तर केवळ काही तासांच्या चांगल्या सोबतीसाठी दिले जातात. गैरप्रकार टाळण्यासाठी याचे नियमही अतिशय कडक ठेवण्यात आले आहेत.
या प्रकारातील कोणतीही भेट हॉटेल किंवा खासगी जागेत न होता केवळ सार्वजनिक ठिकाणीच (Public Places) होते. यामध्ये शॉपिंग पार्टनर, चित्रपट पाहण्यासाठी सोबत किंवा रुग्णालयात जाण्यासाठी मदत अशा सेवा दिल्या जातात.
( नक्की वाचा : DMart News: झेप्टो-ब्लिंकिटमुळे डी मार्टला फटका? दमानींनी शोधला नवा तोडगा, ग्राहकांना मिळणार मोठी लॉटरी )
तासांच्या हिशोबाने मोजावे लागतात हजारो रुपये
या अनोख्या सेवेसाठी आकारले जाणारे दरही थक्क करणारे आहेत. भारतामध्ये वेगवेगळ्या मंचांवर साधारणपणे 2,000 रुपये प्रति तास या दराने असा सोबती बुक केला जातो. चित्रपट पाहणे, शॉपिंग करणे किंवा क्लबिंगला जाण्यासाठी दोन-तीन तास सोबत हवी असल्यास सहज 4,000 ते 6,000 रुपये खर्च होतात. तरुण, कॉलेजचे विद्यार्थी आणि नोकरदार वर्ग अतिरिक्त उत्पन्नाचे साधन म्हणून या व्यवसायाकडे वळताना दिसत आहे.

मोठ्या शहरांमधील एकटेपणाचा नवा व्यवसाय
चित्रपट किंवा शॉपिंगच्या बहाण्याने सुरू असलेला हा ट्रेंड मुळात आधुनिक शहरी जीवनशैली आणि वाढत्या एकटेपणाचे वास्तव समोर आणतो. कामानिमित्त घर-परिवारापासून दूर राहणारे तरुण, ज्यांना सुट्टीच्या दिवशी बोलायला किंवा फिरायला मित्र मिळत नाहीत, ते या सेवांचा आधार घेताना दिसतात.
काही जण केवळ सोशल मीडियासाठी कंटेंट बनवायला तर काही जण नवीन अनुभव घेण्यासाठी याचा वापर करत आहेत. सध्या हा बाजार भारतात असंघटित असला, तरी सोशल मीडियावरील वाढत्या क्रेझमुळे येत्या काळात हा ट्रेंड अधिक मोठा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world