Sant Dnyaneshwar Maharaj Sanjivan Samadhi Sohala : यावर्षी तीर्थक्षेत्र आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 728 वा संजीवन समाधी सोहळा पार पडत आहे. दरवर्षी या सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल होतात. यंदाही आळंदीमध्ये लाखो वारकरी दाखल झालेत. इंद्रायणी नदीत स्नान करून वारकरी माऊलींचं दर्शन घेतात. गेल्या अनेक वर्षांपासून आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा आळंदीत साजरा केला जातोय. काय आहे हा संजीवन समाधी सोहळा आणि कसा साजरा केला जातो याबाबत जाणून घेऊया.
(नक्की वाचा: राजस्थानातील अजमेर दर्गा हा शिवमंदिर असल्याचा दावा, कोणत्या पुस्तकामुळे सुरू झाला वाद?)
संजीवन समाधी सोहळ्याचा इतिहास
महाराष्ट्रात अनेक साधू-संत होऊन गेले. मात्र भगवान सद्गुरू आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनीच संजीवन समाधी घेतली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 13व्या दिवशी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आळंदी येथे संजीवन समाधीत प्रवेश केला. त्यांची समाधी आळंदीतील सिद्धेश्वर मंदिर परिसरात आहे.
आळंदी देवस्थानाचे विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी सांगितल्यानुसार, या संजीवन समाधी सोहळ्याला भगवान पांडूरंग, निवृत्ती महाराज, नामदेव महाराज स्वतः पंढरीवरून येतात अशी मान्यता आहे. एकंदरीत अखंड संत मंडळी याठिकाणी उपस्थित असतात. समाधीचं एकंदरीत वर्णन पाहिलं तर..' देव निवृत्ती दोन्ही धरीले कर' - म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज समाधी घेत असताना, प्रत्यक्ष देव आणि निवृत्तीनाथ यांनी हात धरून ज्ञानेश्वर महाराजांना समाधीजवळ नेलं. यावेळी वारकरी या समाधी सोहळ्याच्या प्रसंग प्रत्यक्षात अनुभवत असतात. मुळात वारकरी संप्रदायामध्ये मृत्यूवर रडण्याचं काही कारण नाही. मृत्यूला जिंकणं हे तत्वज्ञान वारकरी संप्रदायाचा पाया आहे. म्हणूनच हा मृत्यूचा सोहळा नाही, हा संजीवन समाधीचा सोहळा आहे.
(नक्की वाचा: यंदा कर्तव्य आहे? लग्नाच्या तारखांची यादी समोर, 5 महिन्यात 42 मुहूर्त )
कसा साजरा केला जातो संजीवन समाधी सोहळा?
या सोहळ्याची सुरुवात 23 नोव्हेंबरपासूनच सुरुवात होते. परंपरेनुसार संजीवन समाधी मंदिरासमोरील महाद्वारावर असलेल्या हैबतबाबा यांच्या पायरी पूजनाने होते. या सोहळ्यासाठी भगवान विठ्ठलाची पालखी काही आठवड्यांपूर्वी पंढरपूरहून आळंदीच्या दिशेनं मार्गस्थ झाली आहे. मुख्य संजीवन समाधी सोहळ्यात आज म्हणजेच (28 नोव्हेंबर रोजी) दुपारी 12 ते 12.30 च्या दरम्यान लाखो भाविकांच्या उपस्थितीत हॅलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. या सोहळ्याची सांगता 1 डिसेंबर रोजी रात्री 9.30 ते 12.30 दरम्यान माऊलींच्या छबीना मिरवणुकीने होते. या कालावधीत माऊलींच्या संजीवन समाधीवर दररोज अभिषेक, दुग्धारती, महापूजा, नैवद्य, भजन, कीर्तन, पारायण परंपरेनुसार केले जाते. अशाप्रकारे संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा दरवर्षी मोठ्या उत्सवात, जल्लोषात साजरा केला जातो. आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही माउलींच्या समाधी सोहळ्यासाठी आळंदीमध्ये वारकऱ्यांचा मेळा जमा झाला आहे.