Shankh Prakshalana Benefits: पोट साफ होत नाही? एकदा शंख प्रक्षालन करून पाहाच

Shankh Prakshalana Benefits: शंख प्रक्षालन ही प्रक्रिया शरीराची अंतर्गत शुद्धी करण्यासाठी वापरली जाते. शंख प्रक्षालन प्रक्रियेसाठी पूर्वतयारी करणे आवश्यक असते.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Shankh Prakshalana Benefits: शरीराची बाह्य स्वच्छता आपण दररोज करतो परंतु शरीराच्या अंतर्गत स्वच्छतेकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. योग शास्त्र आणि आयुर्वेदामध्ये शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी म्हणजेच डिटॉक्स करण्यासाठी विविध पद्धती सांगितल्या आहेत. यातीलच एक अत्यंत प्रभावी आणि शास्त्रोक्त पद्धत म्हणजे शंख प्रक्षालन आहे. हठयोगातील सर्वात शक्तिशाली शुद्धिक्रियांपैकी ही एक मानली जाते. मानवी पचनसंस्थेचा आकार शंखासारखा असतो आणि त्याचे प्रक्षालन करणे म्हणजेच ती पूर्णपणे धुवून काढणे याला शंख प्रक्षालन असे म्हटले जाते. या क्रियेला वारीसार धौती आणि कायाकल्प क्रिया या नावांनीही ओळखले जाते.

नक्की वाचा: गाजर, बीट, आवळा रस प्यायल्यास काय होतं? डिटॉक्स ज्युसमुळे चेहऱ्यामध्ये घडतील इतके मोठे बदल

'शंख प्रक्षालन' कसे करावे ?

शंख प्रक्षालन ही प्रक्रिया शरीराची अंतर्गत शुद्धी करण्यासाठी वापरली जाते. शंख प्रक्षालन प्रक्रियेसाठी पूर्वतयारी करणे आवश्यक असते. शंख प्रक्षालन क्रियेच्या एक दिवस आधी हलका आहार घेणे गरजेचे असते. शंख प्रक्षालन प्रक्रियेच्या एक दिवस आधी मूग डाळीची खिचडी किंवा पचायला हलके पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. ही प्रक्रिया सकाळी रिकाम्या पोटी केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. यासाठी कोमट पाण्यात चवीनुसार काळं मीठ मिसळून ते पाणी प्यावे लागते. 2 ग्लास पाणी एका दमात प्यायल्यानंतर ताडासन, तिर्यक ताडासन, कटिचक्रासन, तिर्यक भुजंगासन, उदरकार्षण आणि कागासन ही 6 विशेष आसने करण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतर पुन्हा 2 ग्लास पाणी पिऊन हीच आसने पुन्हा करण्यास सांगितले जाते.  जोपर्यंत शौचावाटे केवळ स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत हा क्रम सुरू ठेवण्याची सूचना दिली जाते. या पूर्ण प्रक्रियेदरम्यान साधारणपणे 4 ते 6 लिटर पाणी प्यायले जाते.

नक्की वाचा: पोटातील हवा कशी बाहेर काढावी? करा हे 3 उपाय, पोट फुगणं होईल बंद

बद्धकोष्ठ, गॅस, ॲसिडिटीसारख्या त्रासापासून मिळेल सुटका

या शुद्धिक्रियेमुळे बद्धकोष्ठ, गॅस, ॲसिडिटी आणि अपचन यांसारख्या समस्या मुळापासून नष्ट होण्यास मदत मिळते. आतड्यांमध्ये साठलेला कित्येक वर्षांचा मळ आणि विषारी घटक पदार्थ बाहेर पडल्याने पोट हलकं होते. त्वचा तजेलदार होणे, मुरुमं कमी होतात आणि वजन वेगाने घटण्यास मदत होते. शंख प्रक्षालन करताना तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे अनिवार्य आहे. उच्च रक्तदाब, हर्निया, अल्सर, किडनीचे विकार असलेल्या व्यक्तींनी आणि गर्भवती महिलांनी शंख प्रक्षालन करू नये. शंख प्रक्षालनानंतर 30 ते 40 मिनिटे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो आणि पुढील 24 ते 48 तास चहा, कॉफी तसेच मसालेदार पदार्थ वर्ज्य केले जातात.  मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ योगा यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे IANS वृत्तसंस्थेने या प्रक्रियेबद्दलची सखोल माहिती प्रसारीत केली आहे. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
 

Topics mentioned in this article