- रात्री आईस्क्रीम खाल्याने शरीराच्या चयापचय क्रियेवर विपरीत परिणाम होऊन वजन वाढण्याचा धोका वाढतो
- आईस्क्रीममध्ये साखर आणि फॅट्सचे प्रमाण जास्त असल्यामुळे रात्री त्याची कॅलरीज बर्न होणं कठीण असतं
- अतिरेक्त साखरेमुळे रक्तातील शुगर लेव्हल अचानक वाढून खाली येते आणि त्यामुळे आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो
रात्रीच्या जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याची इच्छा होणे ही नैसर्गिक बाब आहे. मग कुणी गुलाब जाम खातं, कुणी रबडी तर कुणी बासुंदी खाणं पसंत करतं. असं असलं तरी अनेकांची पहिली पसंती 'आईस्क्रीम'ला असते. मात्र, चवीला रंजक वाटणारी ही सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, झोपण्यापूर्वी आईस्क्रीम खाल्याने शरीराच्या चयापचय क्रियेवर (Metabolism) विपरीत परिणाम होतो. याबाबतच आपण काही गोष्टी जाणून घेणार आहोत.
आईस्क्रीममध्ये साखर आणि फॅट्सचे प्रमाण प्रचंड असते. रात्रीच्या वेळी शरीराची हालचाल कमी असल्याने आणि मेटाबॉलिज्म मंदावल्यामुळे या कॅलरीज लवकर बर्न होत नाहीत. परिणामी, दररोज रात्री आईस्क्रीम खाल्ल्याने पोटाचा घेरा आणि वजन वेगाने वाढू शकते. आईस्क्रीममधील अतिरीक्त साखरेमुळे रक्तातील शुगर लेव्हल अचानक वाढते आणि काही वेळाने ती वेगाने खाली येते ही बाब दुर्लक्षीत करणारा नाही असं तज्ज्ञ सांगतात.
या चढ-उतारामुळे झोपेच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. यामुळे रात्री अस्वस्थ वाटणे, घाम येणे किंवा वारंवार जाग येणे अशा समस्या उद्भवू शकतात. तसेच, ज्यांना सायनस किंवा ॲलर्जीचा त्रास आहे, त्यांना रात्री थंड आईस्क्रीम खाल्याने खोकला आणि सर्दी होण्याचा धोका असतो. त्यामुळे मधुमेह, थायरॉईड किंवा पचनाच्या तक्रारी असलेल्या व्यक्तींनी रात्री आईस्क्रीम टाळणेच हिताचे आहे.
जर तुम्हाला गोड खाण्याची तीव्र इच्छा होत असेल, तर आईस्क्रीमऐवजी ताजी फळे, दही किंवा डार्क चॉकलेटचा छोटा तुकडा खाणे केव्हाही चांगले. कधीतरी आईस्क्रीम खाणे ठीक आहे, पण त्याची सवय लावणे महागात पडू शकते. विशेषतः वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी रात्रीच्या आईस्क्रीमपासून चार हात लांबच राहिलेले बरे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world