- अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील रक्त घट्ट होते आणि ब्लड प्रेशर वाढल्यामुळे स्ट्रेस हार्मोन्सही वाढतात
- रात्री उशीरा जागरणे आणि पुरेशी झोप न घेता सकाळी व्यायाम केल्याने अंतर्गत अवयवांचे नुकसान होते
- अपूर्ण झोपेमुळे केसांच्या मुळांवर परिणाम होतो आणि मानसिक ताणामुळे केस गळतीचा धोका वाढतो
Lack Of Sleep Side Effects: वय वर्षे 26, सिगारेट नाही, दारू नाही, कोणतेही वाईट व्यसन नाही... शरीर वरून एकदम पिळदार आणि तंदुरुस्त दिसत होते. पण एका अशा जीवघेण्या सवयीने त्याच्यावर पाळत ठेवली होती, ज्याचा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. एका रात्री अचानक खेळ बदलला; हात सुन्न पडला आणि शरीराने आतून साथ देणे सोडून दिले. कोणतेही व्यसन नसलेल्या या तरुणाला पॅरालिसिसचा (Paralysis) सामना करावा लागला. डॉ. ऋषिकेश कांडेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली ही धक्कादायक घटना सध्या सर्वांचे डोळे उघडणारी ठरत आहे.
रात्री 2-3 वाजेपर्यंत जागणं आणि सकाळी उठून जिम करणं नडले
संबंधित तरुण रोज रात्री 2 ते 3 वाजेपर्यंत जागायचा आणि सकाळी 7 वाजताच उठून कामाला लागायचा. एवढेच नाही तर पुरेशी झोप न घेताच तो रोज न चुकता जिमला जात असे. झोप न घेता व्यायाम करणे म्हणजे इंजिनमध्ये ऑइल नसताना गाडी चालवण्यासारखे आहे, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. याच चुकीमुळे त्याच्या शरीरातील अंतर्गत अवयव आणि आरोग्य पूर्णपणे कोलमडले.
(नक्की वाचा : 8 वर्षात मी 30000 पेक्षा जास्त वेळा शिंकलोय...लाखांचा खर्च अन्...सर्जरी न करता आजार कसा झाला गायब? गंभीर प्रकरण)
अपूर्ण झोपेमुळे शरीरावर काय परिणाम होतो?
डॉक्टर कांडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपूर्ण झोपेमुळे शरीराला फक्त थकवा येत नाही तर रक्त घट्ट होते आणि ब्लड प्रेशर वाढू लागते. यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स वाढतात. माणूस वरवर निरोगी वाटत असला तरी शरीराची आतली दुरुस्ती (Repairing) पूर्णपणे थांबलेली असते. अनेकजण आठवडाभर कमी झोपून शनिवार-रविवारी जास्त झोपतात पण यामुळे झोप कधीच पूर्ण होत नाही.
झोपेचे चक्र बिघडल्याचा सर्वात पहिला फटका केसांच्या मुळांना बसतो. डोक्याच्या त्वचेला होणारा रक्तपुरवठा कमी होतो आणि मानसिक ताणामुळे नवीन केस उगवणे थांबून केस गळती वेगाने वाढते. आयुर्वेदिक डॉक्टर ऋषिकेश कांडेकर यांच्या मते, त्यांच्याकडे येणाऱ्या 90 टक्के रुग्णांच्या केस गळतीचे मुख्य कारण अपूर्ण झोप हेच असते. फक्त झोप सुधारल्यास केस गळतीची अर्धी समस्या तिथेच संपू शकते.
डॉ. ऋषिकेश कांडेकर यांची पोस्ट
तरुणाचा महत्त्वाचा संदेश
पॅरालिसीसचा झटका आल्यानंतर आता पुन्हा चालायला शिकणारा हा तरुण प्रत्येकाला एकच सल्ला देत आहे की, रात्रीची झोप कधीही टाळू नका. झोप म्हणजे फक्त विश्रांती नाही, तर ती शरीराची दुरुस्ती असते. ती चुकवली तर मेंदू, हृदय आणि केस या सर्वच गोष्टी एकाच वेळी खराब होतात.
Photo Credit: Dr.Rushikesh Kandekar
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )