सागर जोशी, प्रतिनिधी
Alert regarding adulterated cosmetics : आपण सुंदर असावं असं कुणाला वाटत नाही. पण सुंदर दिसण्याच्या नादात आपण नकळतपणे गंभीर आजारांना आमंत्रण तर देत नाही ना? बाजारात स्वस्तात मिळणाऱ्या फेअरनेस क्रीमपासून अनेक सौंदर्य प्रसाधनं तुम्हाला मृत्यूच्या दारात उभे करतायत. सुंदर दिसण्याची स्पर्धा दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
भेसळयुक्त सौंदर्य प्रसाधनांपासून अलर्ट राहा...
सोशल मीडियावरील ट्रेंड, जाहिराती आणि गोरेपणाचं आकर्षण यामुळे अनेकजण स्वस्तात मिळणाऱ्या सौंदर्यप्रसाधनांकडे वळतात. मात्र, कमी किंमतीत मिळणाऱ्या अनेक उत्पादनांची गुणवत्ता कशी असते, हे वेगळं सांगण्याची गरज नसावी. अनेक तपासण्यांमधून काही भेसळयुक्त सौंदर्यप्रसाधनांमध्ये पारा, शिसं, स्टिरॉइड्स, हायड्रोक्विनोन तसेच पीपीडी सारख्या घातक रसायनांचा वापर होत असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळं नकळतपणे त्वचेवर लावली जाणारी रसायनं शरीरात शोषली जातात. याचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होतो.
धोकादायक ठरू शकणारी उत्पादने कोणती?
- फेअरनेस क्रीम
- लिपस्टिक
- फेस पावडर
- काजळ
- हेअर डाई
- नेलपॉलिश
अशा सौंदर्यप्रसाधनांचा शरीरावर काय परिणाम होतो?
- त्वचेवर लाल चट्टे, खाज, पुरळ, जळजळ, त्वचा काळवंडणे, त्वचेवरील नैसर्गिक संरक्षण कमी होणे अशा समस्या निर्माण होतात.
- विशेषतः स्टिरॉइडयुक्त क्रीम्समुळे त्वचा पातळ होऊ शकते.
- काही वेळा चेहऱ्यावर रक्तवाहिन्या स्पष्ट दिसू लागतात आणि अकाली वृद्धत्वाची चिन्हेही दिसू शकतात.
- त्वचेचं नुकसान इतकं वाढतं की, नंतर उपचार करूनही मूळ स्थिती मिळवणं कठीण होतं.
- काही उत्पादनांमुळे डोळ्यांमध्ये जळजळ, पाणी येणे, दृष्टीदोष, व्यसनासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात.
- हेअर डाईमध्ये वापरल्या जाणाऱ्या पीपीडी या रसायनामुळे गंभीर अॅलर्जी होऊ शकते
- टाळूला सूज येणे, तीव्र खाज, जखमा होणे आणि केस गळण्यास सुरुवात होणे अशा तक्रारी डॉक्टरांकडे सातत्याने नोंदवल्या जात आहेत.
- काजळ, लिपस्टिक किंवा फेस पावडरमधील शिसे आणि पाऱ्यासारखी रसायनांचा किडनी, यकृत आणि मज्जासंस्थेवरही परिणाम होऊ शकतो
"बाजारात मिळणारी स्वस्त किंवा बनावट सौंदर्यप्रसाधने वापरणे टाळावे. कोणतेही नवीन उत्पादन वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करावी. उत्पादनावरील घटक, उत्पादनाची तारीख आणि एक्सपायरी तपासूनच खरेदी करावी. त्वचेवर त्रास जाणवल्यास त्वरित त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा."
डॉक्टरांच्या मते, गर्भवती महिलांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. कारण पारा आणि शिसेसारखे धातू गर्भापर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे गर्भातील बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. हल्ली सौंदर्यप्रसाधनांचा वापर केवळ महिलांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वच जण विविध कॉस्मेटिक उत्पादनांचा वापर करत आहेत. मात्र या उत्पादनांतील रसायनांची माहिती न घेता केवळ जाहिरातींवर विश्वास ठेवणं अधिक धोकादायक ठरू शकतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world