High Uric Acid: शरीरामध्ये युरिक ॲसिडची पातळी वाढल्याचे समजताच सर्वात आधी काय खावे आणि खाणे टाळावे, याबाबत प्रश्न निर्माण होऊ लागतात. सर्वात मोठा गोंधळ डाळींबाबत निर्माण होतो. एकीकडे शरीराला प्रोटीनची (Protein) गरज असते, तर दुसरीकडे डाळ खाल्ल्याने युरिक ॲसिड आणखी वाढेल की काय? अशी भीतीही असते. अशा परिस्थितीत अनेक जण डाळ खाणेच बंद करतात. पण असे करणे योग्य ठरणार नाही, असे आरोग्यतज्ज्ञांचं मत आहे. डाळी हा प्रोटीनचा एक चांगला स्रोत आहेत आणि आहारातून डाळी पूर्णपणे वर्ज्य करण्याऐवजी योग्य डाळ योग्य प्रमाण खाणे अधिक महत्त्वाचे आहे.
हाय युरिक ॲसिडमध्ये डाळ खावी का?
हाय युरिक ॲसिडची समस्या असल्यास आहारातून सर्व डाळी वर्ज्य करणे आवश्यक नव्हे. डाळींमध्ये प्लांट बेस्ड प्रोटीन (वनस्पतीजन्य प्रथिने), फायबर आणि अनेक आवश्यक पोषक घटक असतात. पण डाळींमध्ये प्युरीन देखील आढळते, म्हणूनच मर्यादित स्वरुपात डाळी खाण्याचा सल्ला दिला जातो. विशेषतः ज्या लोकांना गाऊटचा (Gout) त्रास आहे किंवा युरिक ॲसिडची पातळी खूप जास्त आहे, त्यांनी डॉक्टरांच्या किंवा आहारतज्ज्ञांच्या (डाइटिशियनच्या) सल्ल्यानेच आपला आहार ठरवला पाहिजे.
प्रोटीनसाठी कोणती डाळ उत्तम मानली जाते?
तज्ज्ञांच्या मते हाय युरिक ॲसिड असलेल्या लोकांसाठी मूग डाळ हा एक उत्तम पर्याय मानला जातो. ही डाळ पचनासही हलकी असते. दुसरीकडे मसूर डाळ, तूर डाळ, उडीद डाळ, चणा डाळ, राजमा आणि छोले यासारख्या डाळी - कडधान्यांमध्ये प्युरीनचे प्रमाण तुलनेने जास्त असू शकते. याचा अर्थ असा नाही की त्या पूर्णपणे खाणे सोडून दिल्या पाहिजे तर मर्यादित प्रमाणात सेवन करावे.
(नक्की वाचा: Uric Acid Control Tips: 'मी फक्त डाळ खातो,तरीही युरिक अॅसिड का वाढतंय?' जाणून घ्या काय खावे आणि काय टाळावे)
फक्त डाळीवरच नाही तर डाएटवरही लक्ष द्या
शरीरातील युरिक ॲसिडची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी फक्त डाएटमधील डाळ बदलणे पुरेसे नाही. पुरेसे पाणी पिणे, वजन नियंत्रणात ठेवणे, गोड पेये आणि अल्कोहोल (दारू) यापासून दूर राहणे तसेच लाल मांस आणि ऑर्गन मीटचे (प्राण्यांचे यकृत, भेजे इत्यादी) सेवन कमी करणे देखील तितकेच महत्त्वाचे मानले जाते. जर युरिक ॲसिड वारंवार वाढत असेल किंवा गाऊटचा त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आहारात मोठे बदल करू नये. गाऊट हा युरिक ॲसिड वाढल्यामुळे होणारा सांधेदुखीचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये अनेकदा पायाच्या अंगठ्यासह सांध्यांमध्ये तीव्र वेदना, सूज आणि लालसरपणा येण्याची तक्रार असते.
(नक्की वाचा: Monsoon Diet Tips: पावसाळ्यात चुकूनही या 3 भाज्या खाऊ नका, वाढेल आजारांचा धोका! अपोलो हॉस्पिटलचा मोठा इशारा)
डाळ खाणे सोडल्याने युरिक ॲसिड नियंत्रित होईल का?
नाही. केवळ डाळ खाणे सोडल्याने शरीरातील युरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात येणार नाही. याचे कारण फक्त एखादा अन्नपदार्थ नसून संपूर्ण लाइफस्टाइल आणि डाएट कारणीभूत असतो. म्हणूनच डाळी पूर्णपणे सोडण्याऐवजी योग्य प्रमाण, संतुलित आहार आणि नियमित वैद्यकीय सल्ल्यावर लक्ष देणे अधिक फायदेशीर मानले जाते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world