Von Willebrand Disease: रक्त गोठण्यास मदत करणाऱ्या घटकांच्या (क्लॉटिंग फॅक्टर) कमतरतेच्या महिला रुग्णांमध्ये वाढ होत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. अनेक महिलांना या आजाराबाबत माहिती नसते, कारण त्याची लक्षणे सामान्य मासिक पाळीशी संबंधित समस्यांप्रमाणे भासतात. या विषयावर फारशी चर्चा देखील केली जात नाही मात्र वेळीच निदान न झाल्यास गंभीर धोके निर्माण होऊ शकतात. त्यामुळे महिलांनी असामान्य रक्तस्त्राव आणि आरोग्याच्या लक्षणांकडे वेळीच अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.
महिलांमध्ये आढळणाऱ्या आणि अनेकदा दुर्लक्ष केल्या जाणाऱ्या विकारांपैकी एक म्हणजे ‘व्हॉन विलिब्रँड डिसीज'(Von Willebrand Disease). हा एक आनुवंशिक आजार आहे. या विकारामुळे रक्त योग्यरित्या गोठत नाही. याशिवाय काही महिला हिमोफिलियाच्या कॅरियर (carrier) असू शकतात किंवा यकृताचे आजार, संसर्ग, हार्मोनल असंतुलन किंवा व्हिटॅमिन 'के'च्या कमतरतेमुळेही रक्त गोठण्याच्या समस्या उद्भवू शकतात.
क्लॉटिंग फॅक्टरची कमतरता म्हणजे काय?
क्लॉटिंग फॅक्टरची कमतरता म्हणजे शरीरात रक्तस्त्राव थांबवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रोटीनची कमतरता. महिलांमध्ये ही समस्या आनुवंशिक असू शकते, जसे की हिमोफिलियाचे वाहक असणे किंवा इतर रक्तस्त्रावाशी संबंधित आनुवंशिक विकार. यकृताच्या समस्या, संसर्ग, हार्मोनल बदल किंवा व्हिटॅमिन 'के'च्या कमतरतेमुळेही हा विकार उद्भवू शकतो.
व्हॉन विलिब्रँड डिसीज आजाराची लक्षणे | Von Willebrand Disease Symptoms
या विकाराची लक्षणे अनेकदा दुर्लक्षित केली जातात किंवा सामान्य लक्षणं समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. महिलांना असामान्य किंवा दीर्घकाळ मासिक पाळी येणे, वारंवार शरीरावर निळे डाग पडणे, हिरड्यांतून रक्त येणे किंवा किरकोळ दुखापत अथवा उपचारानंतरही जास्त रक्तस्त्राव होणे अशी लक्षणे दिसू शकतात. काही प्रकरणांमध्ये प्रसूतीनंतर किंवा स्त्रीरोगविषयक शस्त्रक्रियेनंतरही दीर्घकाळ रक्तस्त्राव होऊ शकतो. ही लक्षणे सामान्य मासिक पाळी किंवा हार्मोनल समस्यांप्रमाणे समजून दुर्लक्षित केली जातात, असे मत पुणे येथील मदहुड हॉस्पिटल्सच्या वरिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पद्मा श्रीवास्तव यांनी व्यक्त केले.
(नक्की वाचा : दारू-सिगारेट नाही या सवयीमुळे तरुणाचं आयुष्य उद्ध्वस्त! पूर्ण शरीर कोलमडले, डॉ कांडेकरांनी सांगितली भयंकर घटना)
डॉ. पद्मा पुढे सांगतात की, दर आठवड्याला सुमारे दोन ते तीन महिला अशा लक्षणांसह उपचारासाठी येत आहेत. या रुग्णसंख्येत वाढ होण्यामागे अचूक निदान, वाढती जनजागृती तसेच आहाराच्या चुकीच्या सवयी, तणाव आणि इतर आरोग्यविषयक समस्या यासारखे जीवनशैलीशी संबंधित घटक कारणीभूत ठरतात. निदानास होणारा विलंब हे देखील एक मोठे आव्हान आहे, कारण अनेक महिला या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात किंवा डॉक्टरांकडे जाण्यास उशीर करतात.
(नक्की वाचा : Frequent Urination: सतत लघवीला होतेय? गंभीर आजाराचा धोका वेळीच ओळखा, अन्यथा 1 चूक तुम्हाला ICUमध्ये पोहोचवेल)
डॉ. पद्मा श्रीवास्तव पुढे म्हणाल्या की, या विकारावर उपचार त्याच्या तीव्रतेनुसार केले जातात. यात क्लॉटिंग फॅक्टर रिप्लेसमेंट थेरपी, रक्तस्त्राव नियंत्रित करणारी औषधे आणि नियमित तपासणी यांचा समावेश होतो. योग्य उपचार आणि काळजी घेतल्यास बहुतांश महिला निरोगी आणि सक्रिय आयुष्य जगू शकतात. त्यामुळे महिलांनी असामान्य किंवा अति रक्तस्त्रावाकडे गांभीर्याने पाहून वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा. वेळीच निदान झाल्यास गुंतागुंत टाळता येते आणि जीवनमान सुधारते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)