- वयाच्या तीस वर्षांनंतर अनेकांचे पोट सुटते.
- इन्सुलिनला शरीराची प्रतिसाद क्षमता कमी होऊन अन्नाचे चरबीमध्ये रूपांतरित होण्यामुळे पोटावर चरबी वाढते.
- टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हार्मोन्स कमी होऊन आणि कोर्टिसोल हार्मोन वाढल्यामुळे पोटावर चरबी वाढते
Weight Loss: धावपळीच्या जीवनात 30 वर्षांनंतर पोटावरची चरबी वाढणे किंवा पोट सुटणे ही एक जागतिक समस्या बनली आहे. एम्स (AIIMS) आणि हार्वर्ड प्रशिक्षित गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांच्या मते, हा बदल अचानक होत नाही. तर ती शरीराची एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. 20 व्या वर्षी आपण जे खात होतो, त्याचा परिणाम वजनावर होत नव्हता, पण 30 नंतर मात्र तेच अन्न चरबी वाढवण्यास कारणीभूत ठरते असं डॉ. सौरभ सेठी यांचे मत आहे. त्यांनी यासाठीची आणखी काही कारणे ही सांगितली आहेत. ती तुम्हाला नक्कीच हैराण करतील.
30 वर्षानंतर दर 10 वर्षांनी शरीरातील स्नायूंचे प्रमाण 3 ते 8 टक्क्यांनी कमी होते. स्नायू कमी झाल्यामुळे कॅलरी जाळण्याची शरीराची क्षमता घटते. परिणामी, रक्तातील साखर ऊर्जेत रूपांतरित होण्याऐवजी पोटावर चरबीच्या स्वरूपात जमा होऊ लागते. तसेच, शरीराची इन्सुलिनला प्रतिसाद देण्याची क्षमता 4 ते 5 टक्क्यांनी कमी झाल्यामुळे अन्न लवकर चरबीत रूपांतरित होते. त्यामुळे वयाच्या 30 शीनंतर अनेकांची पोट सुटलेलं दिसते.
तिशीनंतर टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन सारख्या हार्मोन्सची पातळी कमी होते. तर तणावामुळे 'कोर्टिसोल' हार्मोन वाढते. या असंतुलनामुळे शरीराच्या मध्यभागात म्हणजे पोटावर चरबी साठू लागते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केवळ आहार नाही, तर योग्य व्यायामाचीही गरज असल्याचे डॉ. सेठी सांगतात. आपले स्नायू रक्तातील 70 ते 80 टक्के ग्लुकोज वापरतात. पण वय वाढते तसे स्नायू कमी होतात आणि ही साखर रक्तातच राहते. शरीर या साखरेचे रूपांतर वसात (Fat) करते. ज्याचा सर्वाधिक फटका पोटाला आणि कंबरेला बसतो. जर तुम्ही वेळेवर सावध झालात आणि जीवनशैलीत बदल केले, तर वाढत्या वयातही शरीर सुडौल राखता येते.
प्रमुख कारणे:
स्नायूंची कमी (Muscle Loss):
तिशीनंतर स्नायूंचे प्रमाण दर दशकाला 3 ते 8 टक्क्यांनी कमी होते, ज्यामुळे कॅलरी बर्न होण्याचा वेग मंदावतो.
इन्सुलिन रेझिस्टन्स:
शरीराची इन्सुलिनला प्रतिसाद देण्याची क्षमता 5 टक्क्यांनी घटते, ज्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर ऊर्जेऐवजी चरबीत होते.
हार्मोनल असंतुलन:
टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन कमी झाल्यामुळे आणि स्ट्रेस हार्मोन 'कोर्टिसोल' वाढल्यामुळे पोटावर चरबी साठते.
काय उपाय कराल?
डॉक्टरांच्या मते, केवळ डाएटिंग करून उपयोग नाही. स्नायू मजबूत करण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. वेळेत लक्ष दिल्यास वाढत्या वयातील स्थूलता टाळता येऊ शकते.