Nautapa News : मे-जून महिन्यातील भीषण उष्णतेच्या काळात जेव्हा सूर्य रोहिणी नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा 'नवतपा' सुरू होतो. यावर्षी २५ मे ते २ जून या काळात नवतपा असणार आहे. नवतपा म्हणजे कडक उन्हाचे आणि सूर्यप्रकाशाचे ९ दिवस.
नवतपा म्हणजे काय?
दरवर्षी ज्येष्ठ महिन्यात नवतपा लागतो. पंचांगानुसार, जेव्हा सूर्य देवाचा गोचर (प्रवेश) रोहिणी नक्षत्रात होतो, तेव्हा नऊ दिवसांसाठी नवतपा सुरू होतो. नौतपा किंवा नवतपा हा असा काळ मानला जातो, ज्यामध्ये सूर्याची किरणे अत्यंत तीव्र होतात आणि लोकांना उष्ण वारे, कडक ऊन आणि घामाच्या धारांचा सामना करावा लागतो. ज्योतिषशास्त्रापासून ते विज्ञानापर्यंत सर्वच ठिकाणी नवतापाचे कारण आणि महत्त्व सांगण्यात आलं आहे.
नवतपा कधीपासून कधीपर्यंत?
सोमवार, २५ मे रोजी दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांनी सूर्याने रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला असून सूर्य ८ जूनपर्यंत याच नक्षत्रात राहील. सूर्याच्या या नक्षत्र गोचरच्या १५ दिवसांमधील सुरुवातीच्या ९ दिवसांना 'नवतपा' म्हटलं जाते. त्यानुसार, यावर्षी २५ मे ते २ जून या काळात नवतपा असेल.
या वर्षीचा नवतपा अधिकमास किंवा मलमास दरम्यान येत असल्याने ज्योतिषाचार्य याला एक दुर्मिळ योग मानत आहेत. ज्येष्ठ महिन्यात अधिकमास आल्यामुळे यावर्षी ज्येष्ठ महिना दोन महिने चालणार आहे. तसेच, या ९ दिवसांच्या नवतापामध्ये दोनदा मंगळवार येत असल्याने अत्यंत तीव्र उष्णतेचे संकेत मिळत आहेत. मंगळ ग्रहाचा संबंध अग्नी आणि ऊर्जेशी असतो. त्यामुळे या ९ दिवसांत उष्णतेची लाट अधिक तीव्र असेल आणि तापमान ४८ ते ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज आहे.
नवतपाला घाबरू नका!
नवतपाचे नाव ऐकताच लोक घाबरतात. या ९ दिवसांत प्रचंड उष्णता असते. परंतु नवतपाला घाबरण्याची गरज नाही. उलट ते पृथ्वीसाठी एक वरदान आहे. नवतपा पडणे अत्यंत आवश्यक आहे. जर नवतपा पडला नाही, तर आपण सर्व उपाशी राहू. शास्त्रांमध्ये नवतपाचे महत्त्व स्पष्ट करणारे एक सूत्र सांगितलं आहे.
दो मूसा, दो कातरा, दो तीड़ी, दो ताय।
दो की बादी जळ हरै, दो विश्वर दो वाय।।
काय आहे याचा अर्थ?
पहिले दोन दिवस : जर नवतापाच्या पहिल्या दोन दिवसांत कडक ऊन आणि उष्ण वारे चालले नाहीत, तर उंदरांची (मूसा) संख्या प्रचंड वाढेल.
पुढचे दोन दिवस: जर पुढील दोन दिवस उष्णता पडली नाही, तर पिकांचे नुकसान करणारे कीटक (कातरा) खूप वाढतील.
पाचवा आणि सहावा दिवस : जर या दोन दिवसांत उष्ण वारे चालले नाहीत, तर टोळधाडीची अंडी (तीड़ी) नष्ट होणार नाहीत आणि पिकांवर संकट येईल.
सातवा आणि आठवा दिवस : जर या दोन दिवसांत सूर्य तापला नाही, तर ताप पसरवणारे जीवाणू मरणार नाहीत.
शेवटचे दोन दिवस: जर या दिवसांत उष्ण वारे चालले नाहीत, तर विषारी प्राणी (साप-विंचू) नियंत्रणाबाहेर जातील. तसेच शेवटच्या दोन दिवसांत उष्णता नसेल, तर वादळे अधिक येतील आणि पिके उद्ध्वस्त होतील.
नवतापाच्या उष्णतेला किंवा उन्हाच्या लाटेला घाबरून जाण्याची गरज नाही, कारण पृथ्वीच्या कल्याणासाठी आणि शेतीसाठी नवतपाच्या अत्यंत आवश्यक आहे. फक्त या दिवसांत स्वतःचा उन्हापासून बचाव करणे गरजेचे आहे.
(वरील लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world