
Cervical Spondylosis Causes : बदलत्या लाफइस्टाइल आणि धकाधकीच्या जीवनामुळे बहुतांश लोकांना आरोग्याची काळजी घेणे शक्य होत नाही. परिणामी वेगवेगळ्या गंभीर आजारांना आयते निमंत्रण मिळते. सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस हा त्यापैकीच एक गंभीर आजार आहे. या आजारामध्ये पाठीच्या कण्याला सूज येत, यामुळे मानेचा मणका प्रभावित होतो. मणक्याच्या सर्वात वरील भागावर परिणाम होतात म्हणून यास सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस असे म्हणतात. 20 टक्के तरुण प्रौढांमध्ये बैठी जीवनशैली, शारीरिक हालचालींचा अभाव, चुकीच्या पद्धतीने बसणे आणि झोपण्याच्या सवयीमुळे मणक्याच्या विकाराने ग्रासले आहे. तास-न्-तास मोबाइल पाहणे, लॅपटॉपवर काम करणे, वाढता स्क्रीनटाइम आणि बसण्याच्या चुकीच्या स्थिती हे या आजाराचे प्रमुख कारण ठरत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
Cervical Spondylosis होण्यामागील कारणे
सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस हा मानेच्या भागातील मणक्यांच्या घर्षणामुळे निर्माण होतो. या अवस्थेत हाडे आणि कुर्चा यांच्यामध्ये बिघाड झाल्याने मानेच्या भागात अतिशय वेदना होतात. या चुकीच्या शारीरिक स्थितीमुळे आजूबाजूच्या नसा देखील दबल्या जाऊ शकतात, ज्यामुळे सतत वेदना होतात आणि स्नायूंमध्ये कडकपणा येतो. मानदुखी, संवेदनशीलता, तीव्र वेदना आणि अस्वस्थता ही याची लक्षणे आहेत. जर वेळीच उपचार केले नाहीत तर यामुळे दीर्घ काळात शारीरिक हालचालींसंबंधी समस्या उद्भवू शकतात.
(नक्की वाचा: Health Tips : चिकन, मटनपेक्षा देखील 'या' डाळीमध्ये जास्त प्रोटीन, 6 फायद्यांसाठी करा आहारात समावेश)
अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे स्पाइन सर्जन डॉ. मोहित मुथा म्हणाले की, एकाच स्थितीत बसून जास्त वेळ काम केल्याने 30-45 वयोगटातील तरुणांमध्ये सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिसच्या प्रमाणात सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झालीय. ज्यामुळे मणक्यावर जास्त ताण येतो. चुकीच्या शारीरिक स्थितीत जास्त वेळ बसल्याने पाठीचे स्नायू कमकुवत होतात आणि मणक्याची झीज होऊ लागल्यानंतर मणक्यामध्ये रचनात्मक बदल होऊ लागतात. ज्यामुळे तेथील सांध्यांना सूज येणे, स्नायू कडक होणे, शिरा कडक होणे, शिरांवर दाब पडणे अशा समस्या उद्भवतात. योग्य शारीरिक हालचालीशिवाय तास-न्-तास स्वयंपाकघरात काम करणे, दीर्घकाळ उभे राहणे या गोष्टी देखील पाठीच्या कण्यावर ताण निर्माण करू शकते. नियमित स्ट्रेचिंगचा अभाव, चुकीची शारीरिक स्थिती आणि बैठी जीवनशैली ही समस्येला आणखी वाढवत आहे. दररोज 10 पैकी पाच लोक मानेच्या दुखण्याची तक्रार करतात आणि खराब शारीरिक स्थितीमुळे स्नायू कडक होतात, त्यांच्यामध्ये ही स्थिती आढळून येते.
(नक्की वाचा : Cancer Prevention Tips: कॅन्सरपासून नक्कीच होऊ शकतो बचाव, दरवर्षी न चुकता करा हे काम)
Cervical Spondylosisवर काय उपचार करावे?
डॉ. मुथा पुढे असेही म्हणाले की, सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिसच्या उपचारांमध्ये दररोज व्यायाम, स्ट्रेचिंग, योग्य शारीरिक स्थिती राखणे आणि कधीकधी वेदना कमी करण्यासाठी औषधांचा समावेश करणे आवश्यक आहे. गंभीर प्रकरणांमध्ये पाठीच्या कण्यास इंजेक्शन किंवा शस्त्रक्रिया यासारख्या वैद्यकीय उपचारांची आवश्यकता भासू शकते. ही स्थिती टाळण्यासाठी आणि पाठीचा कणा निरोगी ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करा, स्ट्रेचिंग करा, जास्त वेळ बसून राहणे किंवा उभे राहणे टाळा, वारंवार ब्रेक घ्या, चालणे, वजन नियंत्रणात ठेवणे, स्वयंपाकघरात जास्त वेळ उभे राहणे टाळा आणि पाठीच्या कण्याला योग्य आधार देण्यासाठी कामाच्या ठिकाणी किंवा घरी योग्य खुर्ची तसेच टेबलचा वापर करा जेणेकरून तुम्हाला योग्य शारीरिक स्थिती राखता येईल. महत्त्वाचे म्हणजे डेस्क आणि तुमच्या खांद्याचे अंतर योग्य राहील.
लीलावती रुग्णालयातील स्पाइन सर्जन डॉ. समीर रूपारेल म्हणाले की, तरुणांमध्ये मणक्याच्या समस्या वाढत आहेत आणि यामध्ये 15 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झालीय. 30 ते 40 वयोगटातील तरुणांना कामाच्या ठिकाणी तास-न्-तास बसून किंवा जास्त वेळ उभे राहिल्याने सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिसच्या प्रकरणांमध्ये वाढ झालीय. दर महिन्याला मला भेट देणाऱ्या 10 पैकी दोन ते तीन व्यक्ती पाठदुखी आणि मानेच्या वेदनांमुळे त्रासलेले असतात. त्यांना सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिसचा त्रास होतो. दीर्घकालीन मणक्याच्या समस्या टाळण्यासाठी दररोज व्यायाम करणे, नियमितपणे स्ट्रेचिंग करणे आणि योग्य पोश्चर राखणे गरजेचे आहे.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world