Meow Meow Drug Explained : सध्याच्या काळात अमली पदार्थांचं जाळं वेगानं पसरत आहे. 'म्याऊं म्याऊं' (Meow Meow) नावाच्या ड्रग्जने पालकांची आणि प्रशासनाची चिंता वाढवली आहे. या ड्रग्जशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.
'म्याऊं म्याऊं' म्हणजे काय?
याचं शास्त्रीय नाव 'मेफेड्रोन' (Mephedrone) असं आहे. याला 'मॅजिक', 'ड्रोन' किंवा 'एम-कॅट' या नावानेही ओळखले जाते. हे प्रामुख्याने पांढऱ्या पावडरच्या स्वरूपात असतं. कोकेन किंवा हेरॉइनच्या तुलनेत 'म्याऊं म्याऊं' अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध होतं. त्यामुळे कॉलेजमधील विद्यार्थी आणि तरुण वर्ग याकडे सहज आकर्षित होतो. म्याऊं म्याऊं हे घेतल्यावर व्यक्तीला खूप उत्साही, आनंदी आणि आत्मविश्वासपूर्ण वाटू लागतं. भूक आणि झोप कमी होते. ज्यामुळे लोक तासन् तास पार्टी करू शकतात. मेफेड्रोन २०१५ मध्ये NDPS अॅक्ट अंतर्गत बंदी घालण्यात आली होती.
जीवघेणं ड्रग्स....
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ड्रग्ज अत्यंत धोकादायक असून त्याचे परिणाम जीवघेणे ठरू शकतात. यामुळे Hallucinations, भीती वाटणे, चिडचिड होणे आणि नैराश्य येणे असे प्रकार घडतात. हे ड्रग्स घेतल्यामुळे हृदयाचे ठोके वेगाने वाढतात. याशिवाय रक्तदाब वाढतो, शरीराचे तापमान प्रचंड वाढतं यांसारखे त्रास होतात. हे ड्रग्ज एकदा घेतल्यावर त्याचं व्यसन लागतं. व्यक्ती त्याशिवाय राहू शकत नाही. यामुळे किडनी आणि यकृतावरही गंभीर परिणाम होतात. याच्या विळख्यातून वाचण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांच्या वागणुकीवर लक्ष ठेवणे आणि जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे.