Moharram 2026 : इस्लाम धर्मात नव्या वर्षाची सुरुवात मोहरम महिन्याने होते. म्हणजेच मोहरमचा महिना इस्लाम धर्मात वर्षाचा पहिला महिना असतो. याला हिजरीदेखील म्हटलं जातं. हिजरी वर्षाची सुरुवात याच महिन्यापासून होते. इतकच नाही तर मोहरम इस्लामच्या चार पवित्र महिन्यांमधील एक आहे.
मोहरम यंदा कधी आहे?
यंदा मोहरमचा महिना इंग्रजी तारीख १७ जूनपासून सुरू झाला आहे. मोहरमचा सर्वात पवित्र आणि महत्त्वपूर्ण दिवस ज्याला आशूरा म्हटलं जातं, तो २६ जून २०२६ रोजी साजरा केला जाईल.
मोहरममागील प्रथा काय आहे?
इमाम हुसैन आणि त्यांच्या अनुयायांच्या हौतात्म्याच्या आठवणीत जगभरात शिया मुस्लीम मोहरम साजरा करतात. इमाम हुसैन हे पैगंबर मोहम्मद यांचा नातू. ते कर्बलाच्या युद्धात शहीद झाल्याचं मानलं जातं. मोहरम का साजरा केला जाते हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकवावं लागेल. त्यावेळी इस्लाममध्ये खलिफतचे राज्य होते. खलिफा हा जगभरातील मुस्लिमांचा प्रमुख नेता. पैगंबर यांच्या निधनानंतर चार खलिफांची निवड करण्यात आली. लोक एकमेकांमध्ये ठरवून याची निवड करीत होते.
जेव्हा आलं दडपशाहीचं युग..
याच्या ५० वर्षांनंतर इस्लामी जगात दडपशाहीचं युग आलं. मक्कापासून काही अंतरावरील सीरियाचे गर्व्हनर यजीदने स्वत:ला खलिफा घोषित केलं. त्यांची काम करण्याची पद्धत बादशाहांप्रमाणे होती. त्यावेळी ते इस्लामच्या अगदी विरुद्ध होतं. त्यावेळी इमाम हुसैन यांनी यजीदला खलिफा मानण्यास नकार दिला. यामुळे नाराज यजीदने आपले राज्यपाल वलीद पुत्र अतुवा यांना फरमान दिलं की, तुम्ही हुसैनला बोलावून माझ्या आदेशाचं पालन करण्यास सांगा. जर तो नाही म्हणाला तर त्याचं मुंडकं छाटून माझ्याकडे पाठविण्यात यावं.
राज्यपाल हुसैनला राजभवनात बोलावलं आणि त्याला यजीदचं फरमान ऐकवलं. यावर हुसैन यांनी म्हटलं, मी एका व्यभिचारी, भ्रष्टाचारी आणि देवाच्या दूताला न मानणाऱ्या यजीदचा आदेश मानू शकत नाही. यानंतर इमाम हुसैन हज पूर्ण करण्यासाठी मक्का शरीफला पोहोचले. तेथे यजीदने आपल्या सैनिकांना प्रवासी बनवून हुसैन यांची हत्या करण्यासाठी पाठवलं, याबाबत हुसैन यांना कळालं. मात्र मक्का एक पवित्र स्थान आहे, जिथं कोणाच्याही हत्येस मनाई आहे.
हुसैन यांच्या हातातच मुलाचा मृत्यू...
त्यामुळे रक्तपात टाळण्यासाठी, हुसेन यांनी हजऐवजी उमराह हा एक छोटा विधी केला आणि आपल्या कुटुंबासह इराकला परत आले. मोहरम महिन्याच्या २ तारखेला ६१ हिजरीमध्ये हुसैन आपल्या कुटुंबासह कर्बलामध्ये होते. ९ तारखेपर्यंत यजीद यांच्या सैन्यला समजावण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र त्यांनी ऐकलं नाही. यानंतर हुसैन यांनी सांगितलं की, तुम्ही मला एका रात्रीचा वेळ द्या, ज्यात मी अल्लाहची उपासना करू शकेन. या रात्रीला आशूरची रात्र म्हटलं जातं. दुसऱ्या दिवशी, हुसेन यांचे ७२ अनुयायी युद्धात मारले गेले.
तेव्हा फक्त हुसैन एकटे राहिले होते, पण अचानक त्यांना तंबूतून आवाज ऐकू आला, त्याचा सहा महिन्यांचा मुलगा अली असगर तहानलेला होता. हुसैन यांनी त्याला हातात उचलून मैदान-ए-कर्बलामध्ये आणलं. त्यांनी यजीदच्या सैन्याला मुलाला पाणी देण्याची विनंती केली. मात्र सैन्याने ऐकलं नाही आणि हुसैन यांच्या हातात तडफडत मुलाचा मृत्यू झाला. यानंतर भुकेलेला आणि तहानलेला हजरत इमान हुसैन यांचीही हत्या करण्यात आली. हुसैन यांनी इस्लाम आणि मानवतेसाठी हौतात्म्य पत्करलं. त्यामुळे याला मातमचा दिवस म्हटलं जातं. इराकची राजधानी बगदादच्या दक्षिण पश्चिमच्या कर्बलामध्ये इमाम हुसैन आणि इमाम अब्बास यांचं तीर्थक्षेत्र आहे.
(वरील लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. NDTV मराठी कोणताही दावा करीत नाही)