Shravan 2025: श्रावण महिना पूर्णपणे भगवान शंकराला समर्पित असतो. शिवभक्त पूर्ण भक्तीभावाने आणि श्रद्धेने श्रावण महिन्यात शंकराची पूजा करतात. या काळात भक्त दररोज भगवान शिव आणि माता पार्वतीचं पूजन करतात. याशिवाय श्रावण सोमवारचं देखील विशेष महत्त्व आहे. या दिवशी शिवभक्त उपवास करतात आणि शिवलिंगावर पाणी, दूध, बेलपत्र इत्यादी अर्पण करतात आणि जलाभिषेक करतात.
श्रावण हा हिंदू पंचांगानुसार पाचवा महिना आहे, जो सामान्यतः जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात येतो. श्रावण महिन्याच्या तारखा भारतातील वेगवेगळ्या भागांनुसार बदलतात. यावर्षी महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गोवा, कर्नाटक आणि तमिळनाडू या राज्यांता श्रावण महिन्याची सुरुवात 25 जुलै 2025 (शुक्रवार) रोजी होणार आहे. तर 23 ऑगस्ट 2025 (शनिवार) रोजी श्रावण महिना संपणार आहे.
(नक्की वाचा- July Month Festival Calender: आषाढी एकादशी, गुरुपोर्णिमा ते श्रावण मास.. जुलै महिन्यातील सणांची संपूर्ण यादी)
श्रावण सोमवार व्रत
14 जुलै - पहिला सोमवार
21 जुलै - दुसरा सोमवार
28 जुलै - तिसरा सोमवार
4 ऑगस्ट - चौथा आणि शेवटचा सोमवार
श्रावण महिन्यातील व्रत आणि फायदे
पौराणिक कथांनुसार, श्रावण महिना हा चातुर्मासाचा पहिला महिना आहे, ज्या काळात भगवान विष्णू योगनिद्रेत असतात. विश्वाचा कार्यभार भगवान शिव सांभाळतात. या काळात भक्त आत्मचिंतन, उपवास आणि पूजा करतात. या महिन्यातील प्रत्येक दिवस, विशेषतः सोमवार भगवान शिव यांच्या पूजेसाठी शुभ मानला जातो. श्रावणातील प्रत्येक सोमवार हा श्रावण सोमवार म्हणून साजरा केला जातो. असे मानले जाते की या काळात केलेली पूजा आणि उपवास लवकर फलदायी ठरतात. या उपवासामुळे सुख, समृद्धी, आरोग्य आणि इच्छापूर्ती होते अशी श्रद्धा आहे.
अविवाहित मुलींसाठी श्रावण सोमवार व्रत मनपसंत वर मिळवण्यासाठी विशेष फलदायी मानले जाते. विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी हे व्रत करतात. मंगळवारी मंगळ गौरी पूजा केली जाते, जी माता पार्वतीला समर्पित आहे.
(नक्की वाचा- Horoscope July 2025: जुलै महिन्यात शनी आणि गुरू बदलणार चाल, 3 राशींच्या व्यक्तींना होणार फायदा)
श्रावणातील सण आणि महत्त्व
श्रावण महिन्यात अनेक सण देखील असतात. ज्याचे हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामध्ये नाग पंचमीच्या या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते. श्रावण पौर्णिमेला (9 ऑगस्ट 2025) रक्षा बंधन आणि नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. श्रीकृष्ण जयंती आणि दहीहंडी हे सण देखील श्रावण महिन्यात येतो. पोळा सणाला शेतकरी बैलांची पूजा करतात. तर पिठोरी अमावस्येला विशेष पूजा केली जाते.
(Disclaimer : सदर लेख सर्वसाधारण माहितीवर आधारित असून, NDTV मराठी याची लेखाची पुष्टी करत नाही)