IIT News: आयआयटीमधून शिक्षण पूर्ण करून करोडो रुपयांचे पॅकेज मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी केवळ प्रवेश मिळवणे पुरेसे नसते, तर योग्य ब्रँच निवडणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. देशातील प्रसिद्ध आयआयटीमधील प्लेसमेंटचे आकडे पाहता, दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे सर्वाधिक पॅकेजेस हे प्रामुख्याने कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग म्हणजेच सीएसई (CSE) ब्रांचच्या विद्यार्थ्यांना मिळाल्याचे समोर आले आहे.
आयआयटी प्रशासनाकडून सर्वाधिक पॅकेज मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव किंवा ब्रांच अधिकृतपणे जाहीर केली जात नसली, तरी प्लेसमेंट रिपोर्टवरून या ब्रांचचा दबदबा स्पष्ट झाला आहे. आयआयटीच्या अधिकृत वेबसाईट आणि प्लेसमेंट रिपोर्टच्या आधारे देशातील 5 मोठ्या आयआयटीमधील सर्वोच्च पॅकेजेसची माहिती समोर आली आहे.
आयआयटी बॉम्बे
देशातील सर्वात नामांकित संस्थांमध्ये आयआयटी बॉम्बे अग्रस्थानी आहे. नुकत्याच झालेल्या प्लेसमेंटमध्ये येथील विद्यार्थ्याला तब्बल 3.67 कोटी रुपयांचे आंतरराष्ट्रीय पॅकेज मिळाले आहे. आयआयटीने या विद्यार्थ्याचे नाव आणि ब्रांच उघड केली नसली, तरी मिळालेल्या आकडेवारीनुसार कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनाच यंदाही सर्वात मोठे ऑफर्स मिळाले आहेत.
( नक्की वाचा : Toll Plaza: टोल नाक्यावर 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ लागल्यास टोल माफ होतो? NHAI ने सांगितला नेमका नियम काय? )
आयआयटी दिल्ली
आयआयटी दिल्लीचा प्लेसमेंट रेकॉर्ड दरवर्षीप्रमाणे यंदाही चर्चेत राहिला. येथील विद्यार्थ्याला सुमारे 2.5 कोटी रुपयांपर्यंतचे आंतरराष्ट्रीय पॅकेज मिळाले आहे. सर्वोच्च पॅकेज मिळवणाऱ्या विद्यार्थ्याची माहिती गोपनीय ठेवण्यात आली असली, तरी गेल्या काही वर्षांचा कल पाहता सीएसई (Computer Science and Engineering) ब्रांचच्या विद्यार्थ्यांनाच जगातील मोठ्या टेक कंपन्यांकडून सर्वाधिक पॅकेजेसच्या ऑफर्स मिळाल्या आहेत.
आयआयटी खरगपूर
देश-विदेशातील नामांकित कंपन्या दरवर्षी आयआयटी खरगपूरच्या कॅम्पसमध्ये भरतीसाठी येतात. यंदाच्या प्लेसमेंटमध्ये येथे सुमारे 2.68 कोटी रुपयांचे सर्वोच्च पॅकेज मिळाले आहे. या प्लेसमेंट प्रक्रियेत कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक नोकऱ्यांच्या ऑफर्स मिळाल्या असून अनेक विद्यार्थ्यांना परदेशात काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.
( नक्की वाचा : काय आहे BH सीरिजची नंबर प्लेट? कुणाला मिळते आणि काय आहेत फायदे? सोप्या शब्दात समजून घ्या सर्व माहिती )
आयआयटी कानपूर
उत्कृष्ट प्लेसमेंट रेकॉर्डसाठी आयआयटी कानपूर ओळखले जाते. यंदाच्या प्लेसमेंट सत्रात येथे 1.9 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची आंतरराष्ट्रीय ऑफर मिळाली आहे. आयआयटीने विद्यार्थ्याचे नाव आणि ब्रांच जाहीर केली नसली, तरी उपलब्ध आकडेवारीनुसार सीएसईच्या विद्यार्थ्यांनाच या ठिकाणीही सर्वाधिक हाय-पॅकेजच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत.
आयआयटी मद्रास
आयआयटी मद्रास हे देशातील टॉप आयआयटीमध्ये गणले जाते. यंदाच्या प्लेसमेंटमध्ये येथील विद्यार्थ्याला सुमारे 1.31 कोटी रुपयांचे सर्वोच्च पॅकेज मिळाले आहे. प्लेसमेंटच्या अहवालानुसार, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग म्हणजेच सीएसईच्या विद्यार्थ्यांना सर्वाधिक मोठे पॅकेज आणि सर्वात उत्तम सरासरी पॅकेज (Average Package) मिळाले आहे.
कोणती ब्रँच मिळवून देते सर्वाधिक पॅकेज
गेल्या काही वर्षांमधील प्लेसमेंटचे विश्लेषण केले असता, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनीअरिंग (CSE) ही सर्वाधिक हाय-पॅकेज मिळवून देणारी सर्वोत्तम ब्रँच ठरली आहे. गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲपल, क्वालकॉम, जेन स्ट्रीट यांसारख्या जगातील आघाडीच्या टेक कंपन्या प्रामुख्याने याच ब्रांचच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या देतात. अर्थात, केवळ या ब्रांचमध्ये प्रवेश घेतल्याने कोट्यवधींचे पॅकेज मिळत नाही, तर त्यासाठी उत्तम कोडिंग स्किल्स, नवीन तंत्रज्ञान शिकणे, दर्जेदार इंटर्नशिप आणि प्रोजेक्ट्सवर काम करणे तितकेच आवश्यक असते. यामुळेच दरवर्षी सर्वोच्च पॅकेज मिळवणाऱ्यांमध्ये या ब्रांचचे वर्चस्व पाहायला मिळते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world