इस्लाममध्ये पैगंबर मोहम्मद यांचं चित्र काढण्यास मनाई का? फोटो का दाखवला जात नाही? कुराणमध्ये काय म्हटलंय?

इस्लामचे शेवटचे पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी चर्चा करताना एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, की प्रेषित पैगंबर मोहम्मद यांचं कोणतंही चित्र दाखवलं जात नाही. मात्र असं का?

जाहिरात
Read Time: 3 mins

Why Prophet Muhammad image not shown : इस्लामचे शेवटचे पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी चर्चा करताना एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, की प्रेषित पैगंबर मोहम्मद यांचं कोणतंही चित्र दाखवलं जात नाही. मात्र असं का? इस्लाममध्ये मोहम्मद पैगंबर यांचा फोटो का दाखवला जात नाही? चित्र काढण्यास मनाई का केली जाते? जाणून घेऊया त्यामागील कारणं... (Why is the image of Prophet Muhammad not shown?)

इस्लाममध्ये पैगंबर मोहम्मद यांना चित्रातून किंवा प्रतिमांमधून चित्रित करण्यास मनाई आहे. त्यांचे चित्र रेखाटनं किंवा पुतळा बनवणं हा अपमान मानला जातो. इस्लाममध्ये मूर्तीपूजा वर्जित आहे. त्यामुळे प्रेषितांचे चित्र वा पुतळा तयार केल्यास मूर्तिपूजेला प्रोत्साहन मिळतं असाही समज आहे. 

Advertisement


कुराणमध्ये नेमकं काय म्हटलंय?

इस्लामचा पवित्र ग्रंथ कुराणमध्ये अल्लाह किंवा पैंगबर मोहम्मद यांच्या रंगवलेल्या प्रतिमा चित्रित करण्यास स्पष्टपणे मनाई करण्यात आली नसल्याचं सांगितलं जातं. मात्र कुराणमध्ये अनेक ठिकाणी असंही म्हटलंय ज्याच्या आधारावर जाणकार म्हणतात की पैगंबर मोहम्मदाचं चित्र काढता येऊ शकत नाही. काही जाणकारांच्या मते कुराणच्या ४२ व्या सुराच्या ४२ व्या आयातात म्हटलं आहे की, अल्लाह पृथ्वी आणि स्वर्गाची निर्मिती करणारा आहे. त्याच्या चित्रासारखी अशी काहीही गोष्ट नाही. कुराणमधील लिहिलेल्या गोष्टींनुसार, इस्लामचे जाणकार अर्थ काढतात की, अल्लाहाला कोणत्याही माणसाच्या हातातून तयार केलेल्या फोटोमध्ये कैद करता येऊ शकत नाही. त्याचं सौंदर्य इतकं जास्त आणि महिमा इतका मोठा आहे की, माणसाच्या हातून याचं चित्रण होऊ शकत नाही. जर कुणी असं केलं तर याला अल्लाहचा अपमान मानला जाईल. फोटो वा प्रतिमेमुळे मूर्तीपूजेला प्रोत्साहन मिळू शकतं.  

कुराणमध्ये याबद्दल काहीही विशिष्ट सांगितलेलं नाही, मात्र हदीसमध्ये (पैंगबर मोहम्मद यांनी त्यांच्या आयुष्यात जे म्हटलं किंवा केलंय त्याला हदीस म्हटलं जातं) पैगंबर मोहम्मद यांचा फोटो काढण्यास मनाई करण्याचं स्पष्ट केलं आहे. बीबीसी मराठीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे. 

नक्की वाचा - Who are Bohra Muslims? : बोहरा मुस्लीम कोण आहेत? इतर मुस्लीम अन् बोहरांमध्ये फरक काय? खतना प्रथा काय आहे?


हदीसमध्ये काय म्हटलं आहे?

पैगंबर मोहम्मद यांनी आपल्या जीवनात जे काही म्हटलंय किंवा केलंय त्याला हदीस म्हटलं जातं. मोहम्मद साहेबांच्या निधनानंतर ते लिहिण्यात आलं होतं. हदीसनुसार, अल्लाह, मोहम्मद पैगंबर, ख्रिस्ती, ज्यू परंपरेतील सर्व प्रमुख पैगंबरांचे चित्रण करण्यास बंदी आहे. 

Advertisement

पैगंबरांची चित्र काढण्यावरुन वाद...

२००५ - डेन्मार्कच्या युलांड्स-पोस्टेन वृत्तपत्राने प्रेषित दाखवणारे १२ कार्टून्स काढल्यानंतर मुस्लीम देशांनी टीका केली. 

२०११-२०१२ - शार्ली एब्लोची शरिया एब्दो विशेषांकाची घोषणा, पॅरिस कार्यालयावर पेटता गोळा टाकून हल्ला

२०१५ - पैगंबरांची कार्टून्स प्रकाशित केल्यामुळे शार्ली एब्दो कार्यालयावर हल्ला, १२ कर्मचाऱ्यांची हत्या

२०२० - सॅम्युएल पेटी या शिक्षकाची वर्गात प्रेषितांचं कार्टून दाखवल्यामुळे शिरच्छेद करून हत्या. 

(वरील लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)