- डॉ. आयुष शर्मा, ऑर्थोपेडिक स्पाइन सर्जन
Winter Health News: हिवाळ्याच्या दिवसांना सुरुवात होताच शारीरिक समस्याही वाढण्यास सुरुवात होते. बहुतांश लोक हात-पाय दुखण्याच्या समस्येमुळे त्रस्त असतात. थंडीच्या दिवसात रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि सांध्यांना रक्तपुरवठा कमी प्रमाणात होतो. यामुळे सांधे आखडतात आणि वेदना वाढते. स्नायूंमधील लवचिकपणा कमी होतो तसेच चुकीच्या शारीरिक स्थितीमुळे हाडांवर ताण येतो आणि सांधेदुखी होऊ शकते.
हिवाळ्यात सांध्यांचे दुखणे का वाढते?
हिवाळा ऋतू सुरू झाला की श्वसन, त्वचा, सांधे आणि हाडांच्या वेदनांमध्ये वाढ होते. गुडघे, कंबर, खांदे आणि पाठीच्या कण्याच्या समस्या अधिक वाढतात. थंडीमुळे सांध्याभोवतीचे स्नायू तसेच मऊ ऊती घट्ट होतात परिणामी स्नायूंची लवचिकता कमी होते. ज्यामुळे शरीराची सामान्य हालचाल करतानाही हाडं आणि सांध्यावरील भार वाढतो. जेव्हा वातावरणाचा दाब कमी होतो, तेव्हा शरीरातील पेशी आणि सांध्यांमध्ये दाब वाढतो आणि सांध्यांचे दुखणे वाढते. एकाच ठिकाणी बसून राहणे, शरीराची हालचाल न होणे, चुकीच्या शारीरिक स्थितीमुळे सांधे मनक्यांवर ताण येतो. म्हणूनच हिवाळ्यात आरोग्याची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
(नक्की वाचा: Skin Care: त्वचेवर ग्लो येण्यासाठी 7 दिवस प्या 7 ज्युस, चेहऱ्यासाठी सर्वात बेस्ट पेय कोणते? वाचा माहिती)
सांधेदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी ही काळजी घ्या
- हिवाळ्यात प्रत्येकाने त्यांच्या हाडांच्या आणि सांध्याच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
- सांध्याभोवतालचे स्नायूंचे आकुंचन टाळण्यासाठी तसेच शरीराला ऊब मिळावी यासाठी संपूर्ण शरीर झाकणारे कपडे परिधान करावे.
- स्नायूंना आराम मिळावा तसेच रक्ताभिसरण सुधारण्यासाठी गरम पाण्याने स्नान करा.
- योग्य शारीरिक स्थिती बाळगा, जास्त वेळ उभे राहणे किंवा बाक काढून बसणे टाळा.
- जर तुम्ही बराच वेळ एकाच ठिकाणी बसून काम करत असाल तर दर 30 ते 60 मिनिटांनी काही वेळासाठी उभे राहा किंवा चालण्याचा व्यायाम करावा.
- स्नायू मजबूत राहावे यासाठी हलके स्ट्रेचिंग, योग किंवा चालणे यासारखे व्यायाम करून शरीर सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न करा.
- भरपूर पाणी प्या, संतुलित आहाराचे सेवन करा, याद्वारे स्नायूंचे आरोग्य निरोगी राहील. सांध्याभोवती येणारी सूज टाळण्यास मदत मिळेल.
- जर तुम्ही संधिवात किंवा स्पाइनल स्पॉन्डिलायसिस यासारख्या समस्यांचा सामना करत असाल तर हॉट-पॅक थेरपीमुळे स्नायूंचा कडकपणा दूर करता येईल.
(नक्की वाचा: Vitamin D: उन्हाव्यतिरिक्त व्हिटॅमिन डी कसे मिळवावे? या टिप्स फॉलो केल्यास रॉकेट स्पीडने वाढेल Vitamin D)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)