अनेकदा महिलांच्या ड्रायव्हिंगची खिल्ली उडवली जाते आणि पुरुष हेच उत्तम ड्रायव्हर असतात, असा एक मोठा समज आहे. तुम्हालाही असे वाटते का की, महिला या पुरुषांच्या तुलनेत खराब गाडी चालवतात? जर तुमचे उत्तर 'हो' असेल, तर आता तुम्हाला तुमची ही विचारसरणी पूर्णपणे बदलण्याची वेळ आली आहे.
झुनो जनरल इन्शुरन्सने नुकताच आपला नवा 'इंडिया रोड सेफ्टी रिपोर्ट 2026' प्रसिद्ध केला आहे. या अहवालाने ड्रायव्हिंगशी संबंधित अनेक जुने गैरसमज पूर्णपणे मोडून काढले आहेत. या रिपोर्टमध्ये केवळ महिला उत्तम ड्रायव्हर असल्याचे सिद्ध झाले आहे.
महिला ठरल्या पुरुषांपेक्षा भारी
महिला ड्रायव्हर्सबाबत असलेल्या स्टीरियोटाइपला या अहवालाने मोठी चपराक दिली आहे. झुनो स्मार्टड्राइव्ह ॲपच्या माध्यमातून तब्बल 4.5 मिलियन पेक्षा जास्त ट्रिप्सचा डेटा गोळा करण्यात आला.
(नक्की वाचा- मुंबई-पुणे एक्सप्रेसवे 'मिसिंग लिंक' प्रकल्पाला 'शिंग्रोबा' यांचे नाव द्या! मुख्यमंत्र्यांकडे थेट पत्राद्वारे)
या टेलीमेट्री डेटानुसार, सुरक्षित ड्रायव्हिंगच्या बाबतीत महिलांचा सरासरी ड्रायव्हिंग स्कोर 92.86 राहिला आहे. तर पुरुषांचा स्कोर 92.43 असा नोंदवला गेला आहे. जरी या दोन स्कोरमधील फरक खूप कमी असला, तरी यावरून हे स्पष्ट झाले आहे की, महिला रस्त्यांवर पुरुषांइतक्याच किंबहुना त्यांच्यापेक्षा अधिक चांगल्या आणि सुरक्षित पद्धतीने गाडी चालवतात.
रात्री 9 ते 10 ची वेळ सर्वात धोकादायक
डेटानुसार, भारतात रात्री 8 वाजेनंतर लोकांचा ड्रायव्हिंग स्कोर वेगाने खाली घसरायला लागतो. विशेषतः रात्री 9 ते 10 या वेळेत रस्त्यावर गाडी चालवणे सर्वात जास्त धोकादायक असते. या तासात सर्वात जास्त निष्काळजीपणाने गाड्या चालवल्या जातात.
याउलट, जर तुम्हाला सर्वात सुरक्षित प्रवास करायचा असेल, तर दुपारी 1 ते 2 ची वेळ सर्वोत्तम मानली गेली आहे. या वेळेत बहुतांश चालक अत्यंत शिस्तीत आणि सुरक्षितपणे गाडी चालवतात, त्यामुळे या वेळेत ड्रायव्हिंग स्कोर सर्वात चांगला असतो.