World Health Day 2025: जागतिक आरोग्य दिनाच्या (World Health Day 2025) निमित्ताने महानगरपालिका मुख्यालयात पार पडलेल्या एका कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत 'मीठ आणि साखर जनजागृती' या अभियानाचा शुभारंभ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने सोमवारी (7 एप्रिल 2025) करण्यात आला. याप्रसंगी 'मीठ आणि साखर जनजागृती' अभियानाच्या भित्तीफलकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच मा-मित्र प्रकल्पअंतर्गत गरोदर महिला आणि बालकांसाठी सेवा अधिक सक्षम करण्याच्या अनुषंगानेही जनजागृती अभियानाअंतर्गत भित्तीफलकाचे प्रकाशन देखील करण्यात आले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबईकरांच्या आहारामध्ये प्रतिदिन वापरल्या जाणाऱ्या मिठाचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे निर्देश गगराणी यांनी या कार्यक्रमादरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाला दिले. यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाचे ब्रीदवाक्य 'निरोगी सुरूवात, आशादायक भविष्य' (Healthy beginnings, hopeful futures) असे आहे. तर महानगरपालिकेच्या अभियानाचे घोषवाक्य 'स्वस्थ रहा, मस्त रहा' असे असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे कळवण्यात आले आहे.
रक्तक्षय जनजागृतीसाठी लाल रंग कमाल मोहीम
बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत गरोदर मातांमधील रक्तक्षय (Anaemia) कमी करण्याबाबत "लाल रंग कमाल रंग" ही मोहीम राबवण्यात येत आहे. माता आणि बाळांचे आरोग्य हे निरोगी कुटुंब आणि समुदायांचा पाया आहे. ही मोहीम वर्षभर चालणार आहे.
(नक्की वाचा: Health News: हेडफोन्सचा अति वापर कानांसाठी किती घातक? काय आहेत दुष्परिणाम? ही बातमी नक्की वाचा)
मा - मित्र हेल्पडेस्क
बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागातील 11 आरोग्य सुविधांमध्ये (03 वैद्यकीय महाविद्यालये, 02 प्रसूतीगृहे, 06 सर्वसाधरण रूग्णालय) 'मा-मित्र हेल्पडेस्क' उपक्रम जुलै 2024 पासून अरमान बिगर शासकीय संस्थेच्या सहकार्याने राबवण्यात येत आहे. सर्व गर्भवती महिलांना त्यांच्या संस्थात्मक प्रसूतीपर्यंत (Institutional delivery) प्रसूतीपूर्व काळजी आणि नियमित अंतराने समुपदेशन करण्यात येते. तसेच मातांना एक वर्षापर्यंतच्या बाळाच्या संपूर्ण लसीकरणासाठी देखील कॉल केले जातात. तसेच अतिजोखमीची परिस्थिती असलेल्या गर्भवती महिलांच्या उपचारांचे पालन, ट्रॅकिंग (Tracking) आणि फॉलोअप (follow up) साठीचा तपशील संबंधित हेल्थ पोस्टला पाठवण्यात येते. बृहहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सेवेमार्फत आजमितीस 33 हजार 528 गर्भवती महिलांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. तसेच केंद्र शासनाच्या किलकारी या कार्यक्रमाअंतर्गत सर्व नोंदणीकृत गर्भवती महिलांना विना मूल्य स्वयंचलित व्हॉईस कॉल आणि एसएमएससच्या माध्यमातून समुपदेशन केले जाते. या प्रकल्पामुळे मुंबईतील निरोगी आई आणि निरोगी बाळाचे ध्येय साधण्याचे ध्येय साध्य होईल.
(नक्की वाचा: Morning Walk Benefits: उन्हाळ्यात सकाळी किती वेळ आणि कोणत्या वेळेस करावा वॉक?)
गर्भधारणा झाली असे कळताच संबंधित गरोदर महिललेने नजीकच्या आरोग्य केंद्रात नोंदणी करावी व प्रसूतीपूर्व देखभाल विषयी माहिती करून घ्यावी. गर्भवती मातांसाठी उपलब्ध असलेल्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.
"मीठ व साखर जनजागृती" अभियान – "हेल्दी खा, स्वस्थ रहा, मस्त रहा"
जागतिक आरोग्य संघटना आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संयुक्तपणे करण्यात आलेल्या स्टेप्स सर्व्हे 2021नुसार, मुंबईतील नागरिकांमध्ये 34% उच्च रक्तदाब आणि 18% मधुमेहाचे प्रमाण आढळून आले आहे. मीठ आणि साखर आपल्या अन्नामध्ये चवीसाठी वापरल्या जाणाऱ्या सामान्य घटकांपैकी एक आहे. मीठ आणि साखर यांच्या अतिवापरामुळे उच्च रक्तदाब, मधूमेह, हृदयविकार यासारखे गंभीर आजार होण्याचा धोका असतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, भारतीय व्यक्ती अपेक्षित "पाच ग्राम" मिठापेक्षा जास्त मिठाचे सेवन करतात. तर मुंबईकर प्रतिदिन नऊ ग्रॅम मीठाचे सेवन करतात. ही बाब लक्षात घेता, मुंबईकर नागरिकांनी मिठाच्या सेवनाचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे.
भविष्यातील पिढ्यांमध्ये असंसर्गजन्य रोगांचा (NCDs) प्रतिबंध करण्यासाठी मीठ आणि साखरेच्या अतिरिक्त सेवनाबाबत जनजागृती अभियान राबवण्यात येणार आहे. रोजच्या आहारात मीठ व साखरेचे प्रमाण कमी करण्याबाबत नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे. समुदाय स्तरावर व शाळा येथे अतिरिक्त मीठ आणि साखर याबाबत जनजागृती करून लहान वयातच आरोग्यदायी सवयी रुजवण्याचे महत्त्व सांगितले जाईल.
विविध देशात केलेल्या संशोधनाद्वारे असे आढळून आले की, लहान वयात मीठाचा वापर कमी केल्याने तरुण वयात उच्च रक्तदाब, मधूमेह आणि हृदयविकार इत्यादी आजार होण्याचा धोका कमी करता येते. जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आणि मे महिन्यात साजरा करण्यात येणाऱ्या (मीठ जनजागृती अभियानाचा आठवडा (Salt Awareness Week) च्या निमित्ताने बृहन्मुंबई महानगरपालिका तसेच पार्टनरशीप फॉर हेल्दी सिटिज् (Partnership for Healthy Cities) आणि अमेरिकेअर्स इंडिया फाऊंडेशन (Americares India Foundation) यांच्या सहकार्याने "मीठ व साखर जनजागृती" अभियान राबविण्यात येणार आहे.
अभियानाचे उद्दिष्ट :
1. मुंबईकरांना रोजच्या आहारातील मीठ आणि साखर कमी प्रमाणात वापराबाबत जनजागृती करणे
2. खाद्य पदार्थावरील फुड लेबल्स (Food Labels) वाचण्याबाबत जनजागृती करणे
3. प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे मर्यादित सेवन करण्याबद्दल प्रोत्साहित करणे
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )