
- डॉ. बिपीनचंद्र भामरे, कन्सल्टंट कार्डिअॅक सर्जन, सर एच.एन.रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रीसर्च सेंटर
World Heart Day 2025: छातीमध्ये होणाऱ्या वेदना ही आजकाल सर्व वयोगटातील व्यक्तींमध्ये आढळणारी सामान्य समस्या आहे. पण बहुतांश वेळेस लोक अॅसिडिटी किंवा अपचनाचा त्रास म्हणून याकडे दुर्लक्ष करतात. छातीमध्ये दुखण्याची समस्या साधारणतः अॅसिडिटीमुळे निर्माण होऊ शकते तर काही वेळेस हे हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षणही असू शकते.
पोटातील आम्ल अन्ननलिकेमध्ये जाते त्यावेळेस अॅसिडिटीची समस्या उद्भवते. अॅसिडिटीमुळे छाती आणि घशामध्ये जळजळ होते, आंबट ढेकर येतात, जेवल्यानंतर किंवा झोपताना अस्वस्थता जाणवते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेतल्यास हा त्रास कमी होऊन तीव्र स्वरुपातील धोका टळू शकतो. अॅसिडिटी ही नियंत्रणात आणण्यासारखी समस्या आहे.
शरीरातील ही लक्षणे जीवघेणी ठरू शकतात
पण हृदयविकाराचा झटका ही पूर्णतः वेगळी स्थिती आहे. धमन्यांमध्ये रक्ताच्या गाठी तयार झाल्याने हृदयाकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहामध्ये अडथळे निर्माण होतात आणि छातीमध्ये अचानक तीव्र स्वरुपात वेदना होऊ लागतात. छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूस दाब आल्यासारखंही जाणवते. कधीकधी हात, मान, जबडा अथवा पाठीच्या भागातही वेदना होऊ लागतात. यासोबत श्वासोच्छवासाशी संबंधित समस्या, घाम येणे, मळमळणे आणि चक्कर येणे असाही त्रास होतो. ही हृदयविकाराची लक्षणे आहेत आणि याकडे दुर्लक्ष करणे जीवघेणे ठरू शकते.
छातीमध्ये दुखतंय? या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका
- अॅसिडिटी आणि हृदयविकार यामध्ये खूप फरक आहे. अॅसिडिटीची वेदना सहसा जेवणानंतर वाढते आणि औषधांमुळे कमी होते.
- तर हृदयविकाराची वेदना अचानक तीव्र होते आणि छातीच्या भागात दाब आल्यासारखी असते. ही समस्या औषधांमुळे ठीक होत नाही.
- शंका आल्यास स्वतःचा अंदाज बांधण्याऐवजी त्वरित वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे.
(नक्की वाचा: World Heart Day 2025: हृदयाच्या आरोग्याकडे तरुणांचे होतंय दुर्लक्ष, शरीराच्या या लक्षणांमुळे उद्भवतील गंभीर समस्या)
तुमच्या हृदयाची अशी घ्या काळजी
- हृदय आणि पचनसंस्थेचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी जीवनशैलीमध्ये आवश्यक ते बदल करणं गरजे आहे. तिखट-तेलकट पदार्थ, कॅफीनयुक्त पेय, मद्यपान, धू्म्रपान करणे टाळावे.
- नियमित व्यायाम करावा, वजन नियंत्रणात ठेवावे, योग-ध्यानधारणा करावी.
- रक्तदाब, कोलेस्टेरॉल आणि रक्तशर्करेची पातळी नियमित तपासणी करणे गरजेचे आहे.
छातीमध्ये वेदना होणे, छातीच्या भागामध्ये दाब येणे, श्वासोच्छवासाशी संबंधित समस्या, घाम येणे यासारखी लक्षणे हृदयविकारांचे संकेत असू शकतात. त्यामुळे छातीमध्ये होणाऱ्या वेदनेमागील कारण अॅसिडिटी आहे, असे समजून त्याकडे दुर्लक्ष करणे टाळा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world