
World Heart Day 2025: हृदयविकारांमुळे जगभरात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढतंय. दैनंदिन जीवनातील सवयींमुळे हृदयविकारांचा धोका वाढत असल्याचे तज्ज्ञांच्या निदर्शनास येतंय. आरोग्याशी संबंधित गुंतागुंत टाळण्यासाठी आणि निरोगी आरोग्यासाठी 40-45 वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्यांनी आवश्यक वेद्यकीय तपासणी करणे गरजेचं आहे. तपासण्यांद्वारे आरोग्याला असणारा धोका समजल्यानंतर हृदयविकारांवर नियंत्रण ठेवणे कदाचित शक्य होऊ शकते.
अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या 2023च्या अहवालानुसार, भारतातील एकूण मृत्यूंपैकी 30 टक्के मृत्यूमागील कारण हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार आहेत. ज्याचे प्राथमिक कारण म्हणजेच इस्केमिक हृदयरोग (Ischemic Heart Disease). या अहवालातील माहितीनुसार आहाराच्या अयोग्य सवयी, ताणतणाव, मधुमेह, उच्च रक्तदाब, धूम्रपान, प्रदूषण, व्यायामाचा अभाव यासारख्या गोष्टींमुळे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो.
हृदयविकाराचा झटका आणि हार्ट फेल्युअर यासारख्या हृदयाशी संबंधित समस्यांनी ग्रस्त लाखो रुग्ण भारत देशामध्ये आहेत. तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या टेस्ट करणे गरजेचे आहे आणि किती दिवसांच्या अंतराने या तपासण्या कराव्या, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता खालील टेस्ट नक्की करा
1. रक्तदाबाचे निरीक्षण
हृदयविकारांच्या रुग्णांना आठवड्यातून दोन-तीन वेळा रक्तदाब निरीक्षण करण्याचा वैद्यकिय सल्ला दिला जातो.
2. लिपिड प्रोफाइल (कोलेस्टेरॉल चाचणी)
हाय कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्समुळे हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच हृदयविकारग्रस्तांनी सहा महिन्यांनी कोलेस्टेरॉलची पातळी तपासून घ्यावी.
(नक्की वाचा: World Heart Day 2025: छातीमध्ये होणारी वेदना हार्ट अटॅक आहे की अॅसिडिटी, कसे ओळखाल?)
3. इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ECG)
हृदयाच्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ECG चेक करावा.
4. स्ट्रेस टेस्ट
ताणतणावामुळेही हृदयविकारांचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे दरवर्षी स्ट्रेस टेस्ट करुन घ्यावी.
(नक्की वाचा: World Heart Day 2025: हृदयाच्या आरोग्याकडे तरुणांचे होतंय दुर्लक्ष, शरीराच्या या लक्षणांमुळे उद्भवतील गंभीर समस्या)
5. मधुमेह
सहा महिन्यांनी रक्तातील साखरेची पातळी तपासावी.
मधुमेह आजारामुळे हृदयविकार आणि हृदयाशी संबंधित समस्यांमुळे मृत्यू होण्याचा धोका वाढू शकतो.
नियमित तपासणी केल्याने हृदयविकारग्रस्तांना आरोग्याचे व्यवस्थापन करण्यास मदत मिळेल, गंभीर गुंतागुंतीची परिस्थिती टाळता येईल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world