लक्ष्मण सोळुंके, जालना:
Jalna Food Poisoning: जालन्यात फूड पॉइझनिंगची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाणीपुरी खाल्ल्यानंतर तब्बल 15 ते 16 जणांना उलट्या-जुलाबाचा त्रास झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेत लहान मुलांचाही समावेश असून सर्वांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जालन्यातील जुना जालना भागातील टट्टूपुरा परिसरात ही घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं?
टट्टूपुरा भागात एका फेरीवाल्याने पाणीपुरी विक्रीसाठी गाडा लावला होता. परिसरातील लहान मुलांसह काही नागरिकांनी या गाड्यावर पाणीपुरी खाल्ली. पाणीपुरी खाल्ल्यानंतर काही वेळातच नागरिकांना उलट्या-जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे अनेकांना अशक्तपणा जाणवू लागला. त्रास वाढत गेल्याने रात्री उशिरा बाधित नागरिकांना शहरातील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
प्राथमिक तपासणीत पाणीपुरी खाल्ल्यामुळेच फूड पॉइझनिंग झाल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून महापालिका प्रशासन आणि अन्न सुरक्षा विभागाच्या कार्यक्षमतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शहरातील फेरीवाल्यांची तातडीने तपासणी करावी, तसेच दोषी फेरीवाल्यावर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
( नक्की वाचा : Anil Ambani अनिल अंबानी आणि कुप्रसिद्ध जेफरी एपस्टीनचे चॅट लीक; स्वीडिश मुलीच्या ऑफरवर उद्योगपतीची प्रतिक्रिया )