नेपाळ बस दुर्घटनेत जळगावातील 24 जणांचा मृत्यू, वायुसेनेच्या विमानाने शनिवारी मृतदेह महाराष्ट्रात आणणार

Nepal Accident : मृतदेह नेपाळवरून उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे आणण्यात येतील. तेथून वायुसेनेच्या विमानाने नाशिक येथे ते आणले जातील. त्यानंतर कुटुंबियांकडे मृतदेह सोपवण्यात येणार आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins

नेपाळमध्ये झालेल्या बस दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील 24 जणांच्या मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करत कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. याअपघातातील मृतदेह तातडीने महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. 

याप्रकरणी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला तात्काळ प्रतिसाद देत वायुसेनेच्या विमानाने उद्या शनिवारी  24 जणांचे मृतदेह नाशिक येथे आणण्यात येणार आहेत. तेथून कुटुंबियांकडे ते पोहोचवण्यात येणार आहेत.

जळगाव जिल्ह्यातील भाविकांच्या बसला नेपाळमध्ये दुर्घटना झाल्याने 24 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील मदत व पुनर्वसन विभागातील अधिकारी, केंद्रीय अधिकारी यांच्याशी सातत्याने संवाद साधत मदतीच्या कामाची माहिती घेतली. 

मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद साधून भाविकांचे मृतदेह महाराष्ट्रात तातडीने आणण्याकरिता विनंती केली होती. याप्रकरणी राज्याला सर्वतोपरी मदत करू.  त्यासाठी समन्वयासाठी विशेष अधिकारी नियुक्त केल्याचेही केंद्रीय गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले. 

Advertisement

दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या मागणीला तात्काळ प्रतिसाद वायुसेनेचे विशेष विमान मृतदेह आणण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उद्या हे मृतदेह नेपाळवरून उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे आणण्यात येतील. तेथून वायुसेनेच्या विमानाने नाशिक येथे ते आणले जातील. त्यानंतर कुटुंबियांकडे मृतदेह सोपवण्यात येणार आहेत. 

Topics mentioned in this article