सरहद संस्था आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 21, 22,23 फेब्रुवारी 2025 या काळात दिल्लीला होणार आहे. यापूर्वी 1954 साली 37 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीला झाले होते. त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ, संमेलनाध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी तर उद्घाटक तत्कालिन पंतप्रधान पंडित नेहरू होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीला या संमेलनानंतर बळ मिळाले आणि 1 मे 1960 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानंतर दिल्लीला एकदाही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले नाही. शरद पवारांनी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपद स्वीकारलं आहे.
नक्की वाचा - साहित्य क्षेत्रात 'एक हैं तो सेफ हैं' नाहीच; विद्रोहीच्या संयोजकांचा मराठी साहित्य संमेलनात सामील होण्यास नकार
नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर 70 वर्षांनी दिल्लीत होणाऱ्या या संमेलनाचे आयोजन सरहद संस्थेद्वारे केले जात असून त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसेचे नेते राज ठाकरे, नितीन गडकरी आदी नेत्यांना विविध कार्यक्रमात संस्थेने निमंत्रित करण्यात आलं आहे. याशिवाय देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार, मुरलीधर मोहोळ, चंद्रकांतदादा पाटील आणि विनोद तावडे यांचे सहकार्य घेतले जाईल. मात्र या संमेलनावर राजकीय नेत्यांचा जास्त प्रभाव असणार नाही, असंही सांगितलं जात आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
दिल्ली ही देशाची राजकीय राजधानी असल्यामुळे येथे होणारे संमेलन सर्वसमावेशक व्हावे या भावनेतून या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी अनुभवी, ज्येष्ठ व साहित्यरसिक व्यक्ती व्हावी असा संयोजक समितीने प्रयत्न केला त्यातून शरद पवार यांनी स्वागताध्यक्ष व्हावे अशी संस्थेने विनंती केली आणि ती त्यांनी आज मान्य केली. शरद पवार हे केवळ उत्तम वाचक अथवा साहित्यप्रेमी नसून महाराष्ट्रातून सांस्कृतिक आणि साहित्यिक चळवळीशी प्रारंभापासून जोडले गेले आहे. त्यांनी औरंगाबाद (2004), नाशिक (2005), चिपळूण (2013) आणि सासवड (2014) येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले आहे.
तर 1990 साली त्यांनी स्वागताध्यक्ष व्हावे असे पुण्यातील संमेलनात समितीने ठरविले होते. मात्र त्यावर्षी ते होऊ शकले नाही. यंदा दिल्लीमध्ये महाराष्ट्राची अस्मिता ज्या व्यक्तींभोवती केंद्रीत असते त्यातून सर्वात ज्येष्ठ नाव शरद पवार यांचे आहे. त्यांच्या अनुभवांमुळे हे संमेलन अविस्मरणीय होईल आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन मराठी भाषा आणि संस्कृतीचा जागर करणारे ठरेल असा विश्वास आज सरहद संस्थेचे संजय नहार, डॉ. शैलेश पगारिया, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे मिलिंद जोशी आणि सुनिता राजे पवार तसेच संयोजन समितीचे डॉ. सतिश देसाई यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.