खानापूर-आटपाडीचे शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या 'ट्री आर्मी' या वृक्षलागवड चळवळीचे कौतुक करण्यासाठी जॅकी श्रॉफ यांनी विटा येथे विशेष उपस्थिती लावली होती. गार्डी-घानवडच्या माळावर ट्री आर्मी आणि जेके फाउंडेशनच्या माध्यमातून तब्बल साडेचार हजार वृक्षांची लागवड करण्यात आली, ज्याचा शुभारंभ जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते झाला.
“फुल दिले की फुलच मिळते आणि दगड दिले की दगडच मिळते. त्यामुळे कुणी टीका केली तर शांत राहायचं. कुणाचे पाय कापून तर आपण उंच होणार नाही,” असा अत्यंत मोलाचा आणि जगण्याचा संदेश प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी दिला.
आमदार सुहास बाबर म्हणजे 'पिंपळासारखा उत्साह'
कार्यक्रमात बोलताना जॅकी श्रॉफ यांनी सुहास बाबर यांच्या कामाची तोंडभरून स्तुती केली. “खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर म्हणजे पिंपळाच्या झाडासारखा सळसळता उत्साह आहे. त्याला वाढवण्याची, जपण्याची आणि पाणी घालण्याची जबाबदारी तुमची-आमची आहे,” अशा हृदयस्पर्शी शब्दांत त्यांनी बाबर यांना पाठबळ दिले. फक्त बोलणारे आणि प्रत्यक्ष काम करणारे यांच्यात मोठा फरक असतो, असे म्हणत सुहास बाबर हे कृतीत प्रामाणिक असल्याचे जॅकी श्रॉफ यांनी सांगितले. पृथ्वी ही आपली आई असून तिचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत, असा संदेशही त्यांनी दिला.
Suhas Babar
निवडणुकीतील मताधिक्याइतकी झाडे लावणार: सुहास बाबर
आमदार सुहास बाबर यांनी सांगितले की, ट्री आर्मी ही कोणत्याही एका राजकीय पक्षाची नसून ही संपूर्ण समाजाची लोकचळवळ आहे. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड मताधिक्याइतकी झाडे लावण्याचा संकल्प त्यांनी केला असून, पुढील दोन वर्षांत 78000 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जॅकी श्रॉफ यांच्या उपस्थितीमुळे विट्यातून सुरू झालेली ही ट्री आर्मी आता राष्ट्रीय आणि जागतिक नकाशावर पोहोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जॅकी दादांच्या साधेपणाने जिंकली मने
कार्यक्रमादरम्यान जॅकी श्रॉफ यांच्या साधेपणाने सर्वांनाच भुरळ पाडली. आमदार सुहास बाबर यांच्या पत्नी सोनिया बाबर यांनी जॅकी श्रॉफ यांचे औक्षण करून आणि पुष्पवृष्टी करून स्वागत केले. यानंतर जॅकी दादांनी बाजरीची भाकरी, तूप, गूळ आणि मीठ असा अत्यंत साधा मराठमोळा नाश्ता केला.
यावर बोलताना आमदार बाबर म्हणाले, "मला वाटायचे की मी खूप जमिनीवर राहून काम करतो, परंतु जॅकी दादांच्याकडे पाहिल्यावर माझा हा भ्रम फुटला. एवढा मोठा सेलिब्रिटी असूनही इतके विनम्र आणि साधे कसे राहता येते, हे पाहून मी आवाक झालो आहे."
प्रशासकीय आणि राजकीय मान्यवरांची उपस्थिती
या पर्यावरण सोहळ्याला मुंबईहून जॅकी श्रॉफ यांचे मित्र आणि ड्रीम वर्थ सोल्यूशन या कंपनीचे संचालक उपस्थित होते. तसेच खानापूर पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा भोसले, नगराध्यक्षा काजल म्हेत्रे, उपनगराध्यक्ष अमोल बाबर, प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार योगेश्वर टोम्पे, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, उपसभापती सुहास शिंदे, माजी नगरसेवक अमर शितोळे आणि खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंत बाबर यांच्यासह अनेक मान्यवर व ट्री आर्मीचे पदाधिकारी उपस्थित होते.