Naxalism : भूपतीच्या आत्मसमर्पणानंतर माओवादी चळवळीचं पुढे काय? हिडमा आणि देवूजीबाबत मोठी अपडेट समोर

भारतातील नक्षलवाद आणि माओवादच्या 58 वर्षांच्या इतिहासात सर्वात मोठे आत्मसर्पण गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयात बुधवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत घडले.

जाहिरात
Read Time: 3 mins

नक्षलवाद्याचा म्होरक्या भूपतीच्या आत्मसर्पणानंतर माओवादी चळवळीत पुढे काय घडणार याबाबत बरीच चर्चा सुरू झाली आहे. भूपतीनंतर आता हिड्मा आणि सर्वोच्च नेता देवूजी देखील आत्मसर्पण करण्याची शक्यता पोलीस सूत्रांची खात्रीलायक माहितीतून व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृह मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माओवाद्यांच्या शीर्ष नेतृत्वापैकी एक आणि केंद्रीय समितीतील मोठा नेता 69 वर्षीय मल्लोजुला वेणुगोपाल राव ऊर्फ 'भूपती' याच्या नेतृत्वाखाली एकूण 61 माओवादी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पण केले. या सामूहिक आत्मसमर्पणामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांची विश्वासार्हता ठळकपणे दिसून आली असून राज्याच्या सुरक्षा यंत्रणेवरील तसेच महाराष्ट्र सरकारच्या नक्षल पुनर्वसन योजनेवरील विश्वास अधिक बळकट झाला आहे.

भारतातील नक्षलवाद आणि माओवादच्या 58 वर्षांच्या इतिहासात सर्वात मोठे आत्मसर्पण गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयात बुधवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत घडले. या कार्यक्रमात संबोधन करताना येत्या काळात शंभर दीडशे माओवादी आत्मसमर्पण करतील अशी आपली माहिती असल्याचे फडणवीस म्हणाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि छत्तीसगढ येथील उच्च पदस्थ पोलिस सूत्रांची माहिती अत्यंत धक्कादायक आहे.

हिडमा आत्मसमर्पण करण्याच्या चर्चांना जोर...

मुख्यमंत्री फडणवीसांनी बुधवारी आत्मसर्पण सोहळ्यानंतर माध्यमांशी बोलताना भारतातील माओवादाची कंबर मोडली अशा आशयाचं विधान केलं. त्यामागची पार्श्वभूमी हीच आहे की बुद्धिवादी, आणि मास्टरमाईंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भूपतीने केलेले आत्मसमर्पण हे खरे तर माओवाद्यांच्या आत्मविश्वासावरच निर्णायक प्रहार आहे. जंगलातील संघर्षात झालेली प्रचंड पिछेहाट, सतत एन्काउंटर, पळापळ, अटकसत्र किंवा समर्पण अशाच घटना होत असलेल्या पाहून माओवादी कॅडरचे मनोबल पुरते ढासळले आहे. ही अनिश्चितता पाहताना माओवादी चळवळीचे भविष्य स्पष्ट समोर दिसत असताना अशातच भूपतीने हा मार्ग चोखाळला आहे. याचा जंगलात उरलेल्या माओवादी नेत्यांवर आणि त्यांच्या कॅडरवर निश्चित परिणाम होत असल्याची माहिती आहे.

Advertisement

त्यामुळे, भूपती नंतर आता छत्तीसगड-आधारित बटालियन क्रमांक एकचा कुख्यात आणि सातत्याने यशस्वी पलायन करत आतापर्यंत कधीच पोलिसांच्या किंवा सी आर पी एफच्या हाती न लागलेला नक्षलवादी कमांडर माडवी हिडमा देखील लवकरच याच मार्गाचा अवलंब करेल, अशी गुप्तचर पोलिसांची माहिती आहे.

उच्च पदस्थ पोलीस सूत्रांनी सांगितलं की, हिडमा जंगलातून आणि अज्ञातवासातून बाहेर पडणार आहे. आता फक्त प्रश्न एवढाच शिल्लक आहे की, माओवादी हिडमा छत्तीसगडमधील स्वतःच्या राज्याच्या दलासमोर आत्मसमर्पण करेल की, महाराष्ट्राच्या अधिक विश्वासार्ह सुरक्षा दलासमोर. हे अद्याप निश्चित नाही. याबाबत मिळालेल्या गुप्तमाहितीच्या आधारांवर पोलिस अधिकाऱ्यांमध्ये विविध तर्क मांडले जात आहेत. बुधवारी एकीकडे गडचिरोली येथे मोठा आत्मसर्पण सोहळा झाला तर तिकडे 50 नक्षल कार्यकर्त्यांनी छत्तीसगड पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यामुळे या शक्यतेला अधिक बळ मिळाले आहे.

Advertisement

नक्की वाचा - Naxalism : 45 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात नक्षलवादाचा शिरकाव कसा झाला? असा आहे नक्षलवादाचा रक्तरंजित इतिहास

माओवादाचे खच्चीकरण आणि पुनर्वसनाचे फायदे...

भूपतीने माओवाद सोडून मुख्य प्रवाहात सामील होणे, तसेच त्याला विविध राज्यांतील 79 गंभीर प्रकरणांमधून माफी मिळणे, हे 1967 पासून सुरू झालेल्या नक्षलवादी आणि माओवादी चळवळीचा झपाट्याने होत असलेला ऱ्हास दर्शवते. भूपतीची पत्नी तारक्का हिचे जानेवारीमध्ये झालेले पुनर्वसन देखील भूपतीचे मुख्य प्रवाहात परतणे सुकर होण्यासाठी कारणीभूत ठरले. महाराष्ट्राच्या मजबूत पुनर्वसन योजनेतून प्रोत्साहन मिळत असल्याने, माओवादी कार्यकर्ते आता गडचिरोलीमधील महाराष्ट्राला अधिक विश्वासार्ह असल्याने पसंती देत आत्मसमर्पणासाठी झुकत आहेत.

Advertisement

महाराष्ट्राचा हिडमासाठी प्रयत्न...

दुसरीकडे, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, नुकताच सीपीआय माओवादी संघटनेच्या सरचिटणीसपदी विराजमान झालेला माओवाद्यांचा वर्तमान सर्वोच्च नेता देवूजी उर्फ थिप्पिरी तिरुपती हा तेलंगणाच्या 'ग्रे हाउंड्स' (Greyhounds) दलाकडे आत्मसमर्पणासाठी झुकण्याची शक्यता आहे. मात्र, इकडे महाराष्ट्रातील गुप्तचर सुरक्षा यंत्रणा आता बटालियन एकचा कमांडर आणि सुरक्षा दलाच्या अनेक वेढा आणि हल्ल्यांमधून यशस्वीपणे बचावला असलेल्या हिडमा याला महाराष्ट्रात आश्रय घेण्यासाठी राजी करण्याचा प्रयत्न करत असून यातून लवकरच परिणाम दिसून येतील असा अधिकाऱ्यांना विश्वास वाटतो. एकूणच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करावा लागू शकतो, असे अधिकाऱ्यांनी NDTV मराठी सोबत ऑफ कॅमेरा बोलताना सांगितले आहे.