शुभम बायस्कार, अमरावती: महायुती सरकारच्या काळात पीकविमा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. या प्रकरणी माजी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर विरोधक निशाणा साधत असतानाच राज्याचे विद्यमान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी अमरावतीमध्ये माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या पीकविम्याबाबत एक धक्कादायक विधान केलं आहे.
"सरकार एक रुपयात पिक विमा देते याचा काही लोकांनी गैरउपयोग केला असे म्हणत हल्ली भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना एका रुपयात पीक विमा दिला" असे मोठे विधान कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले आहे. पीकविम्याची थेट भिकेशी तुलना केल्याने नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
'सरकार एक रुपयात पिक विमा देते याचा काही लोकांनी केला गैर उपयोग केला. पिक विमा योजना यशस्वी व्हावी योग्य त्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे. पिक विमा संदर्भात चांगले वाईट अनुभव सरकारच्या पाठीशी आहेत. पिक विमांच्या कंपन्या लुटमार करतात, असे म्हणत सरकारला पीक विमा बंद करायचा नाही,' असेही त्यांनी नमूद केले.
'पिक विम्यात सुधारणा करायच्या आहेत. पिक विम्यातील गैरप्रकार टाळण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतील. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठकीत योग्य निर्णय होईल.पिक विम्यातील 4 लाख अर्ज नामंजूर केले आहेत,' असे म्हणत या योजनेत मोठे बदल होणार असल्याचे संकेतही कृषिमंत्र्यांनी दिले आहेत.
(नक्की वाचा- संतापजनक! वाळू माफियांकडून महसूल पथकाला पेटवून देण्याचा प्रयत्न; थोडक्यात वाचला जीव)
त्याचबरोबर 'कृषी विभागात अधिकारी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. त्यामुळे आकृती बंद करून नवीन भरती संदर्भात शासन विचार करेल. कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची शेतकऱ्यांना संपर्क साधण्यासाठी एक सिरीजमध्ये नंबर देणार आहे. कृषिमंत्र्यांपासून तर शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत हा परमनंट नंबर असेल,' अशी माहितीही माणिकराव कोकाटेंनी यावेळी दिली.