सुनील दवंगे, अहिल्यानगर
Crime News: अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून एका 15-16 वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. नाशिक-सुरत महामार्गालगत असलेल्या रामशेज किल्ला परिसरातील घनदाट जंगलात या मुलीला कैद करून ठेवण्यात आले होते. राहुरी पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे मुलीची सुखरूप सुटका केली आहे.
13 फेब्रुवारीपासून मुलगी होती बेपत्ता
ही घटना 13 फेब्रुवारी रोजी घडली. पीडित मुलगी नेहमीप्रमाणे सकाळी 9 वाजता 'शाळेत जाते' असे सांगून घराबाहेर पडली, परंतु ती सायंकाळपर्यंत घरी परतलीच नाही. मुलीचा शोध घेऊनही ती न सापडल्याने हवालदिल झालेल्या पालकांनी तात्काळ राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषण सुरू केले. तपासाची चक्रे फिरली आणि पोलिसांना मुलीचे लोकेशन नाशिक जिल्ह्यात असल्याचे समजले.
(नक्की वाचा - Ladki Bahin Yojana: फॉर्ममधील एक प्रश्न अन् लाखो महिला अपात्र! लाडकी बहीण लाभार्थ्यांची संख्या 86 लाखांनी घटली)
रामशेज किल्ल्याच्या जंगलात थरार
18 फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा राहुरी पोलिसांनी नाशिक-सुरत महामार्गावरील रामशेज किल्ल्याजवळील जंगलात छापा टाकला. तब्बल पाच दिवस आरोपींच्या कैदेत असलेल्या मुलीची पोलिसांनी सुखरूप सुटका केली. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याला मदत करणाऱ्या कौसर हैदर पठाण आणि आकाश शरद संसारे यांना अटक केली आहे.
(नक्की वाचा- Gold Rate: सोन्याचे दर लवकरच 1 लाखांच्या खाली येणार? काय आहे कारण?)
पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
पीडित मुलीने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध पॉक्सो (POCSO) कायदा आणि लैंगिक अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींनी मुलीला पाच दिवस जंगलात डांबून ठेवत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण राहुरी तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, अशा गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.