सध्या राज्यातील अनेक भागात तुफान पाऊस सुरू आहे. धरणं भरू लागली आहे. काही ठिकाणी धरणांमधून विसर्गही सुरू झाला आहे. धबधबे प्रवाहित झाले आहे. त्यामुळे पावसाची पर्यटनात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र या सुखद क्षणात अनेक थरारक प्रसंग घडले आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील (Ahilyanagar News) अकोले तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेला रंधा धबधबा (Randha Waterfall) पुन्हा एकदा थरारक घटनेमुळे चर्चेत आला आहे. काल 6 जुलै रोजी सायंकाळी एक तरुण रंधा धबधब्याच्या प्रचंड प्रवाहात पडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ काही पर्यटकांनी शूट केला असून सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
नक्की वाचा - Raigad Suspicious Boat: अलिबागजवळील समुद्रात संशयास्पद बोट, पाकिस्तानी नागरिक उतरले? पोलीस यंत्रणा अलर्ट
रंधा धबधबा हे प्रवरा नदीचं अत्यंत वेगाने कोसळणारं ठिकाण आहे. प्रवरा नदीने काल अक्षरशः रूद्रावतार धारण केला होता. अशातच या धबधब्याच्या किनारी फिरण्यासाठी आलेला एक तरुण अचानक पाण्यात दिसून आला. काही क्षणातच तो धबधब्याकडे ओढला जाऊ लागला. हे दृश्य पाहत असताना तेथील पर्यटक आणि स्थानिकांच्या काळजाचा ठोका क्षणभरासाठी थांबला.
पण सुदैवाची गोष्ट म्हणजे या तरुणाला पोहता येत होतं. त्याने शेवटच्या क्षणी जोर लावत धबधब्याच्या धारेला थोडक्यात चुकवत काठ गाठला आणि आपला जीव वाचवला. या घटनेमुळे “देव तारी त्याला कोण मारी” हे वाक्य अक्षरशः सिद्ध झालं आहे.