- छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यातील अनेक ठिकाणी 6 मार्च रोजी साजरी केली जाणार आहे
- माजी महापौर आणि नगरसेवक श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता
- छिंदम याने शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतल्याने सकल मराठा समाजाने त्याला विरोध दर्शविला आहे
प्रसाद शिंदे
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार 6 मार्चला साजरी केली जाणार आहे. राज्यभर त्याची शिव प्रेमी तयारी करत आहेत. पण ज्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला तिच व्यक्ती आता शिवजयंती साजरी करण्यासाठी पुढे सरसावली आहे. त्याच्या या कृतीने शिवप्रेमींमध्ये मात्र आक्रोश आहे. अशा व्यक्तीला शिवजयंती साजरी करण्यासाठी अजीवन बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसे न झाल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असा इशाराच शिव प्रेमींनी दिला आहे. त्याबाबतचे निवेदन अहिल्यानगरच्या पोलीस अधिक्षकांना ही देण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस काय पाऊल उचलतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अहिल्यानगर शहरांमध्ये शुक्रवारी तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी होत आहे. माजी महापौर आणि नगरसेवक श्रीपाद छिंदम हा या वर्षी शिवजयंती साजरी करणार आहे. हा तोच छिंदम आहे ज्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता. अतिशय खालच्या भाषेत त्याने वक्तव्य केले होते. त्याची ऑडिओ क्लिप ही व्हायरल झाली होती. त्याच्या विरोधात शिव प्रेमींनी संताप व्यक्त केला होता. त्याचा जागोजागी निषेध करण्यात आला होता. मात्र हाच छिंदम पुन्हा एकदा निवडून ही आला आहे. शिवाय त्याने शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासाठी शहराच्या दिल्लीगेट जवळ त्याने मोठं स्टेजही बांधलं आहे. त्याने शिवजयंती साजरी करण्याला शिवप्रेमी आणि मराठा समाजाचा विरोध आहे. शिवाय त्याला सर्व स्तरातून विरोध ही होत आहे. या पार्श्वभूमिवर सकल मराठा समाजाच्यावतीने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन देण्यात आले. श्रीपाद छिंदम यांला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यापासून रोखावे. त्याला शिवजयंती साजरी करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. छिंदमकडून शिवजयंती झाली तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं सकल मराठा समाजाचं म्हणणं आहे. त्यामुळे पोलीसांनी त्याला वेळीच रोखावे अशी मागणी करण्यात आली आहे.
छिंदम याने छत्रपती शिवरायांचा अवमान केला होता. त्याची रेकॉर्डींग व्हायरल झाली होती. त्याच्यावर तो एक डाग लागला आहे. तो डाग पुसण्यासाठी छिंदमची ही धडपड सुरू आहे असा आरोप शिव प्रेमींनी केला आहे. त्याने प्रचंड मोठं स्टेज दिल्ली गेटवर बांधलं आहे. त्यातून त्याला डॅमेज कंट्रोल करायचं आहे. म्हणूनच तो शिवजयंती साजरी करत आहे. अशा माणसाला कधीच माफी दिली नाही पाहीजे असं ही शिवप्रेमी यावेळी म्हणाले. त्याला अहिल्यानगरच काय तर जगात कुठेही शिव जयंती साजरी करण्यासाठी परवानगी नको असंही ते यावेळी म्हणाले. मी बोललो. मी नंतर निवडून ही आलो. माझं कुणी काही करू शकत नाही हेच त्याला दाखवून द्यायचं आहे असा आरोप ही होत आहे.