Ajit Pawar Death : 'उद्या भेटू' म्हणाली अन् काही वेळातच...अजित पवारांच्या विमानातील एअर होस्टेसची करुण कहाणी

Ajit Pawar Plane Crash : या घटनेत प्राण गमावलेली एअर होस्टेस पिंकी माळी हिने अपघातापूर्वी तिच्या वडिलांशी केलेले शेवटचे बोलणे आता समोर आले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
Ajit Pawar Plane Crash : पिंकीचा तो फोन कॉल शेवटचा ठरेल, अशी पुसटशी कल्पनाही तिच्या वडिलांना नव्हती.
मुंबई:

Ajit Pawar Plane Crash : पुणे जिल्ह्यातील बारामतीजवळ झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या भीषण अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेत प्राण गमावलेली एअर होस्टेस पिंकी माळी हिने अपघातापूर्वी तिच्या वडिलांशी केलेले शेवटचे बोलणे आता समोर आले आहे. बाबा, मी अजित पवारांसोबत बारामतीला चालले आहे, असे शब्द सांगणाऱ्या पिंकीचा तो फोन कॉल शेवटचा ठरेल, अशी पुसटशी कल्पनाही तिच्या वडिलांना नव्हती.

मुंबईतील वरळी परिसरात राहणाऱ्या पिंकीने बुधवारी सकाळी तिचे वडील शिवकुमार माळी यांना फोन केला होता. तिने वडिलांना सांगितले होते की, ती अजित पवारांसोबत बारामतीला जात आहे आणि त्यांना तिथे सोडल्यानंतर ती पुढील कामासाठी नांदेडला रवाना होईल. उद्या निवांत बोलूया, असे सांगून तिने फोन ठेवला. शिवकुमार यांनीही तिला कामावर लक्ष देण्यास सांगत उद्या बोलू असे म्हटले, मात्र तो उद्या आता त्यांच्या आयुष्यात कधीच येणार नाही, अशी भावना व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.

( नक्की वाचा : Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमानाचे सारथ्य करणाऱ्या कॅप्टन शांभवी पाठक होत्या तरी कोण? )
 

वडिलांचा टाहो आणि शेवटची इच्छा

शिवकुमार माळी यांनी अत्यंत जड अंतःकरणाने आपल्या मुलीच्या आठवणींना उजाळा दिला. पिंकी गेल्या काही काळापासून अजित पवार यांच्या अनेक दौऱ्यांमध्ये त्यांच्यासोबत असायची. आपल्या मुलीला गमावल्याचे दुःख व्यक्त करताना शिवकुमार म्हणाले की, विमान अपघाताचे तांत्रिक ज्ञान मला नाही, त्यामुळे नक्की काय घडले हे मला समजत नाहीये. पण मी माझी मुलगी गमावली आहे आणि मी पूर्णपणे कोलमडलो आहे. आता मला फक्त माझ्या मुलीचा मृतदेह हवा आहे, जेणेकरून मी तिच्यावर सन्मानाने अंत्यसंस्कार करू शकेन, एवढीच माझी शेवटची इच्छा आहे.

कसा झाला भीषण अपघात?

हा अपघात बुधवारी सकाळी पुणे जिल्ह्यातील बारामती विमानतळाजवळ झाला. दिल्लीस्थित व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचे लिअरजेट 45 हे विमान (नोंदणी क्रमांक VT-SSK) या अपघातात कोसळले. या विमानात उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी विदीप जाधव, एअर होस्टेस पिंकी माळी, मुख्य पायलट सुमित कपूर आणि को-पायलट शांभवी पाठक असे एकूण 5 जण होते. दुर्दैवाने या अपघातात कोणालाही वाचवता आले नाही.

Advertisement

( नक्की वाचा : Ajit Pawar Death : पोकळी मोठी,दावेदार अनेक; अजित पवारांचा राजकीय वारसा पेलण्याची ताकद कोणात? वाचा सविस्तर )
 

वेळेचे गणित आणि नियोजित दौरे

विमान उड्डाणाच्या तपशिलानुसार, या विमानाने सकाळी 8:10 वाजता मुंबईतून उड्डाण केले होते. त्यानंतर सकाळी 8:45 च्या सुमारास या विमानाचा रडारशी असलेला संपर्क तुटला आणि अवघ्या पाच मिनिटांनी म्हणजेच 8:50 वाजता विमान कोसळले. अजित पवार हे 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी पुणे जिल्ह्यात चार सभांना संबोधित करण्यासाठी जात होते. लँडिंगच्या वेळी विमानाने नियंत्रण गमावल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, तातडीने बचाव पथके घटनास्थळी रवाना झाली होती.

अपघाताच्या तपासासाठी विशेष पथक रवाना

या मोठ्या दुर्घटनेनंतर केंद्र सरकारकडूनही तातडीने पावले उचलण्यात आली आहेत. दिल्लीहून एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचे (AAIB) एक विशेष पथक बुधवारी पुण्याकडे रवाना झाले आहे. हे पथक अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेणार आहे. विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला होता की हवामानातील बदलामुळे हा अपघात झाला, याचा सविस्तर तपास आता केला जाणार आहे.

Advertisement