जाहिरात

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमानाचे सारथ्य करणाऱ्या कॅप्टन शांभवी पाठक होत्या तरी कोण?

Who Was Captain Shambhavi Pathak : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीजवळ भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत विमानातील सर्व 6 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये मुख्य पायलट कॅप्टन शांभवी पाठक यांचाही समावेश आहे.

Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमानाचे सारथ्य करणाऱ्या कॅप्टन शांभवी पाठक होत्या तरी कोण?
Who Was Captain Shambhavi Pathak? : एक अत्यंत समर्पित आणि अनुभवी वैमानिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असे.
मुंबई:

Ajit Pawar Death News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीजवळ भीषण अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत विमानातील सर्व 6 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये मुख्य पायलट कॅप्टन शांभवी पाठक यांचाही समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रासह विमान वाहतूक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून एका तरुण आणि कुशल पायलटचा अंत झाला आहे.

कसा झाला अपघात?

बारामती विमानतळावर लँडिंगचा प्रयत्न करत असताना हे चार्टर्ड विमान कोसळले. या लिअरजेट 45 विमानाचे सारथ्य कॅप्टन शांभवी पाठक करत होत्या. विमानाने नियंत्रण गमावल्यामुळे हा अपघात झाल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. 

या विमानात अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षा अधिकारी, दोन पायलट आणि इतर क्रू मेंबर्स असा एकूण 6 जणांचा ताफा होता. या सर्वांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला असून शांभवी पाठक यांनी शेवटच्या क्षणापर्यंत विमान सुरक्षित उतरवण्याचा प्रयत्न केला असावा, अशी चर्चा आता व्यक्त होत आहे.

( नक्की वाचा : Ajit Pawar Net Worth: अजित पवारांचे अपघाती निधन, किती श्रीमंत होते उपमुख्यमंत्री? पाहा संपत्तीचा सर्व तपशील )
 

कोण होत्या शांभवी पाठक? (Who Was Captain Shambhavi Pathak? )

कॅप्टन शांभवी पाठक यांची शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी अत्यंत मजबूत होती. त्यांचे शालेय शिक्षण एअर फोर्स बाल भारती स्कूलमधून झाले होते. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून एरोनॉटिक्स, एव्हिएशन आणि एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये बॅचलर ऑफ सायन्स ही पदवी मिळवली होती. 

वैमानिक होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी न्यूझीलंड इंटरनॅशनल कमर्शियल पायलट अकादमीमध्ये प्रवेश घेतला आणि तिथे प्रगत उड्डाण प्रशिक्षण पूर्ण केले. बिझनेस जेट सेगमेंटमधील एक प्रशिक्षित आणि पात्र पायलट म्हणून त्यांची ओळख होती.

विमान वाहतूक क्षेत्रावर शोककळा

शांभवी पाठक यांच्या निधनामुळे विमान वाहतूक क्षेत्रातील त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये आणि मित्रपरिवारात दुःखाचे वातावरण आहे. एक अत्यंत समर्पित आणि अनुभवी वैमानिक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असे. अनेक वर्षांचे विशेष प्रशिक्षण आणि उड्डाणाचा दांडगा अनुभव असूनही काळाने त्यांच्यावर झडप घातली. त्यांच्या निधनामुळे एका हुशार महिला वैमानिकाला देश मुकला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

डीजीसीएकडून अपघाताची चौकशी सुरू

या भीषण अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी नागरी विमान वाहतूक संचालनालयाने म्हणजेच DGCA ने सखोल चौकशी सुरू केली आहे. तांत्रिक बिघाड, हवामानातील बदल की इतर काही कार्यात्मक कारणे या अपघातामागे होती, याचा तपास आता अधिकारी करत आहेत. विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या विश्लेषणानंतरच अपघाताचे नेमके सत्य समोर येईल. या घटनेने केवळ राजकीय नेतृत्वच नाही, तर शांभवी पाठक यांच्यासारख्या कुशल व्यावसायिकाला गमावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com