अहमदाबादमध्ये गुरुवारी मोठी विमान दुर्घटना घडली. एअर इंडियाच्या या विमानात 242 प्रवासी होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या विमानातील एक व्यक्ती बचावली आहे. बाकी इतर सर्वजणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत 265 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
मुंबई - विमान अपघातात पायलट सुमीत सबरवाल यांच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. सुमीत यांच्या घरी फक्त वडील राहत होते. रात्री उशिरा त्यांची बहीण मुंबईत दाखल झाली. त्यानंतर उशिरा ते अहमदाबादकडे रवाना होणार आहेत.
मुंबई- विमान अपघातात झालेल्या विमानात क्रू मेंबर म्हणून काम करणाऱ्या अपर्णा महाडिक यांचा मृत्यू झाला आहे. त्या सध्या मुंबई येथे राहत होत्या. पण त्या मूळच्या चिपळूण तालुक्यातील धामेली गावच्या आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, खासदार सुनील तटकरे यांचे भाचे अमोल महाडिक यांच्या पत्नी होत्या.
नवी मुंबई- गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात सर्व क्रू सदस्यांच्या मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे. यात पनवेल तालुक्यातील न्हावा गावची रहिवासी आणि हवाई सुंदरी मैथिली मोरेश्वर पाटील हिचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. सकाळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या 10 वाजता न्हावा गावच्या मैथिली पाटील यांच्या घरी भेट देणार आहेत.
नक्की वाचा - Air India Plane Crash: ड्रीमलाईनर्स विमानांची सेवा खंडित करावी, विमान अपघातावर राज ठाकरेंची सविस्तर पोस्ट
डोंबिवली- अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर 27 वर्षीय रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती. रोशनी ही डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरातील नव उमीया कृपा सोसायटीमध्ये आपल्या आई-वडिल आणि भाऊ सोबत राहत होती. तिचे वडील राजेंद्र आई राजश्री आणि भाऊ विघ्नेश हे एकत्रच राहत होते . मुंबई ग्रँट रोड परिसरात राहणारे हे कुटुंब दोन वर्षांपूर्वी डोंबिवलीत स्थायिक झालं होतं.
बदलापूर- अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झालेल्या क्रू मेंबर दीपक पाठकचे कुटुंब बदलापूरच्या कात्रप भागातील रावल कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्याला आहे. 11 वर्षांपासून एअर इंडियामध्ये केबीन क्रू म्हणून दीपक कार्यरत होता.
पंढरपूर- विमान अपघातात पंढरपूरचे दाम्पत्य महादेव पवार आणि पत्नी आशा पवारांचा मृत्यू झाला आहे. संबंधित दाम्पत्य हे अहमदाबाद येथे स्थायिक होतं. त्यांच्या मूळ गावी कुणी राहत नाही.
नागपूर- अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत मूळच्या नागपूरच्या असलेल्या यशा कामदार यांचा मृत्यू झाला आहे. यशा कामदार या आपले पती आणि सासू आणि आपल्या चार वर्षे मुलासोबत लंडनला जात होत्या. मूळच्या नागपूरच्या असलेल्या यशा कामदार यांचं काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते . लग्नानंतर त्या अहमदाबाद मध्ये स्थायिक झाल्या होत्या. नागपूरच्या क्वेटा कॉलनी परिसरात कामदार यांच्या आई वडिलांचे घर आहे. यशा कामदार यांचे आई वडील आणि भाऊ हे या घटनेची माहिती करतात अहमदाबाद कडे कारने रवाना झाले आहेत.
महाराष्ट्रातील मृतांची यादी
- सुमित सबरवाल (विमानाचे मुख्य पायलट)- मुंबईतील चांदिवली भागातील रहिवासी
- सिविक कुंदर - (विमानाचे को-पायलट)- मुंबईतील बोरिवली भागातील रहिवासी
- अपर्णा महाडिक (क्रू मेंबर): अपर्णा या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे यांच्या नातेवाईक आहेत.
- मैथिली पाटील (क्रू मेंबर): मैथिली एअर इंडियाच्या केबिन क्रू मेंबर.
- दीपक पाठक - (क्रू मेंबर) एअर इंडियाचे केबिन क्रू मेंबर होते आणि ते बदलापूरमध्ये राहत होते.
- रोशनी राजेंद्र सोनघरे (क्रू मेंबर): रोशनी या महाराष्ट्रीयन क्रू मेंबर होत्या. त्या मूळच्या डोंबिवलीच्या आहेत.
- महादेव पवार (प्रवासी): मुळचे सांगोल्याचे असलेले महादेव या विमानातून लंडनला जात होते.
- आशा पवार (प्रवासी): आशा या महादेव यांच्या पत्नी असून त्या देखील याच विमानातून प्रवास करत होत्या.
- मयूर पाटील (प्रवासी): मयुर हे महाराष्ट्रातील प्रवासी होते, ज्यांचा या अपघातात मृत्यू झाला.
- यशा कामदार (प्रवासी): यशा या मूळच्या नागपूरच्या असून त्या लंडनला जात होत्या.
- रक्षा मोदा (प्रवासी): यशा यांच्या सासू रक्षा मोदा या देखील लंडनला जात होत्या
- रुद्र मोदा (प्रवासी): यशा कामदार यांचा दीड वर्षीय मुलगा रुद्र मोदा हा देखील याच विमानातून प्रवास करत होता.