मोसिन शेख, प्रतिनिधी
पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यावर नरेंद्र मोदी यांनी व्हीआयपी संस्कृतीला चाप लावण्याचा निर्णय घेत मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या वाहनांवर लाल दिवा वापरण्यावर निर्बंध घातले. पण प्रत्यक्षात खरंच व्हीआयपी संस्कृती मंत्र्यांपासून दूर गेली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आणि हे प्रश्न विचारण्याचं कारण अजित पवारांचा बीड दौरा ठरला आहे. सोमवारी अजित पवारांनी बीड जिल्ह्याचा दौरा केला. अजित पवारांच्या या 11 तासांच्या व्हीआयपी दौऱ्याचा सर्वसामान्यांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे शासकीय रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना देखील अजित पवारांच्या व्हीआयपी दौऱ्याचा फटका बसला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
त्याचं झालं असं अजित पवारांनी सोमवारी आंबेजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात भेट दिली. या रुग्णालयात तीन ठिकाणी अजित पवारांचे कार्यक्रम होते. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला. ज्या कार्यक्रमांना अजित पवार हजेरी लावणार होते, त्या सर्व ठिकाणी सर्वसामान्यांना जाण्यापासून रोखण्यात आलं. एवढेच काय तर आतमध्ये असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना देखील सोडले जात नव्हते.
नक्की वाचा - 1.5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था निर्माण करण्याची मुंबईची क्षमता- देवेंद्र फडणवीस
सकाळी साडेआठ वाजेपासून अजित पवार जाईपर्यंत, म्हणजेच बारा वाजेपर्यंत रुग्णांचे नातेवाईक रुग्णालयाच्या बाहेर ताटकळत उभे होते. कुणाची आई, कुणाचा मुलगी, कुणाची सून रुग्णालयात उपचार घेत होती. रुग्णांच्या जेवणाची वेळ झाली म्हणून नातेवाईक डबे घेऊन येत होते. पण व्हीआयपी दौरा असल्यामुळे नातेवाईकांना आतमध्ये सोडण्यातच आलं नाही. नातेवाईक गयावया करत होते, मात्र सुरक्षा यंत्रणा कुणालाही आत सोडायला तयार नव्हती. काही महिला तर ढसाढसा रडल्या. पण अजित पवार रुग्णालयाच्या बाहेर पडेपर्यंत कुणालाही आतमध्ये सोडण्यात आलं नाही.
अन् महिला ढसाढसा रडली...
याच रुग्णालयात उपचार घेत असलेल्या तरुणासोबत त्याची आई आली होती. मुलांचं ऑपरेशन झालं आणि त्यानंतर त्याने चहा देखील घेतला नाही. त्याला काही खाऊ घालावे म्हणून रुग्णालयाच्या बाहेर आलेल्या या महिलेला पुन्हा आतमध्ये जाऊ दिलं जात नव्हते. मुलगा आतमध्ये असून, त्याला काहीतरी खाऊ घालू द्या म्हणून या महिला सुरक्षा रक्षक यांच्याकडे गयावया करत होत्या, पण त्यांना काही आतमध्ये सोडण्यात आले नाही. मुलाची चिंता लागलेल्या या आईला अश्रू अनावर झाले आणि त्या ढसाढसा रडू लागल्या. पण तरीही अजित पवार जाईपर्यंत कुणालाही रुग्णालयात जाऊ दिले नाही.
नक्की वाचा - Beed News: 'अजित पवार कोत्या मनाचे', शिवराज दिवटेची भेट टाळल्याने मराठा मोर्चाचे समन्वयक संतापले
अजित पवारांकडून अधिकाऱ्यांची कानउघाडणी?
अजित पवारांच्या व्हीआयपी दौऱ्यामुळे रुग्णांचे होणारे हाल NDTV मराठीने महाराष्ट्राला दाखवले. एवढेच नाही तर एनडीटीव्ही मराठीने अजित पवारांना याबाबत प्रश्न देखील विचारला. त्यावर अजित पवारांनी तत्काळ उपस्थित अधिकाऱ्यांचे कान टोचले. महाराष्ट्रभर फिरत असताना माझ्या दौऱ्यामुळे कुणालाही त्रास होऊ नये याची मी काळजी घेतो. बीडच्या अधिकाऱ्यांना अजून माझ्या कामाची सवय झाली नसेल, पण यापुढे माझ्या दौऱ्यामुळे कोणत्याही सर्व सामान्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना अजित पवारांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.