Ajit Pawar Death Mystery: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता या प्रकरणाला राजकीय वळण लागण्यासोबतच तांत्रिक प्रश्नही उपस्थित होऊ लागले आहेत. अजित पवार यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बारामती विमानतळावरील धावपट्टीबाबत अत्यंत खळबळजनक दावे केले आहेत. या दुर्घटनेमागे काही अदृश्य शक्ती किंवा तांत्रिक गडबड तर नव्हती ना, असा संशय व्यक्त करत रोहित पवार यांनी थेट रन-वेच्या निवडीवरच बोट ठेवले आहे. त्यांच्या या दाव्यांमुळे आता तपास यंत्रणांसमोर नवीन आव्हान उभे राहिले असून संपूर्ण महाराष्ट्रात यावरून चर्चेला उधाण आले आहे.
विमानतळावरील दोन धावपट्ट्या आणि सुरक्षेचा प्रश्न
बारामती विमानतळावर रन-वे 11 आणि रन-वे 29 अशा दोन धावपट्ट्या उपलब्ध आहेत. रोहित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रन-वे 29 हा रन-वे 11 च्या तुलनेत अधिक सुरक्षित मानला जातो. याचे मुख्य कारण म्हणजे रन-वे 11 हा टेबलटॉप स्वरूपाचा आहे, जिथे विमान उतरवताना अधिक जोखीम असते.
दुसरीकडे रन-वे 29 हा टेबलटॉप नसल्याने तिथे लँडिंग करणे वैमानिकांसाठी नेहमीच सोपे आणि सुरक्षित असते. असे असतानाही विमानाने धोकादायक समजल्या जाणाऱ्या धावपट्टीची निवड का केली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
( नक्की वाचा : Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांचे अपघाती निधनाबद्दल 5 मोठे प्रश्न, रोहित पवारांनी मागितली उत्तरं )
परवानगी एकाची आणि आग्रह दुसऱ्याचा
रोहित पवार यांनी या अपघाताचा घटनाक्रम मांडताना एटीसी म्हणजेच एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या संवादाचा दाखला दिला. त्यांच्या दाव्यानुसार, सकाळी 8.27 मिनिटांनी पायलटने रन-वे 29 वर उतरण्यासाठी परवानगी मागितली होती आणि एटीसीने ती त्वरित दिली होती.
मात्र, केवळ दोनच मिनिटांत म्हणजेच 8.29 मिनिटांनी पायलटने अचानक आपला निर्णय बदलला आणि रन-वे 11 वर उतरण्याचा आग्रह धरला. सुरक्षित धावपट्टीची परवानगी असतानाही वैमानिकाने धोकादायक रन-वेचा आग्रह का धरला, यामागे नेमके काय कारण होते, याचा शोध घेणे आवश्यक असल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
( नक्की वाचा : Ajit Pawar Death: अजित पवारांचा पायलटच गेम प्लॅनचा भाग होता? रोहित पवारांनी सांगितला मोसादचा 'तो' थरारक पॅटर्न )
विमानाच्या उंचीबाबत तांत्रिक त्रुटीचा दावा
अपघाताच्या तांत्रिक बाजूवर प्रकाश टाकताना रोहित पवार म्हणाले की, विमान धावपट्टीवर उतरवताना एका विशिष्ट अंतरावरून त्याची उंची कमी करणे अपेक्षित असते, ज्याला तांत्रिक भाषेत एमिंग पॉईंट म्हटले जाते. मात्र, या प्रकरणात योग्य अंतर येण्यापूर्वीच विमानाची उंची कमी करण्यास सुरुवात झाली होती.
विमान तिरके होऊन कोसळले नसते, तरीही ते थ्रेशोल्डच्या आधीच म्हणजे धावपट्टीच्या सुरक्षा भिंतीला जाऊन धडकले असते, इतकी विमानाची उंची खाली आली होती. ही केवळ मानवी चूक आहे की यामागे आणखी काही तांत्रिक हस्तक्षेप होता, असा सवाल त्यांनी विचारला आहे.
तपासाची मागणी आणि संशयाचे वातावरण
रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांमुळे अजित पवार यांच्या अपघाती निधनाभोवतीचे संशयाचे जाळे अधिक गडद झाले आहे. धावपट्टीची निवड आणि वैमानिकाचा शेवटच्या क्षणी बदलेला निर्णय या गोष्टी संशयास्पद वाटत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सर्व तांत्रिक बाबींचा सखोल तपास झाल्यास अपघाताचे नेमके कारण समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणातील तांत्रिक माहिती आणि एटीसीमधील संवाद आता तपासाच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world