Ajit Pawar Jayanti News: महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि प्रशासनावर आपल्या तडाखेबंद कार्यपद्धतीने दीर्घकाळ ठसा उमटवणारे राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. सन 2026 मधील राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींच्या अधिकृत शासकीय जयंती कार्यक्रमांच्या यादीत आता अजित पवार यांच्या जयंतीचा समावेश करण्यात आला आहे.
या संदर्भातील अधिकृत परिपत्रक राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने बुधवार(15 जुलै) जारी केले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अजित पवार यांच्या प्रदीर्घ लोकसेवेचा आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासातील त्यांच्या अभूतपूर्व योगदानाचा खऱ्या अर्थाने शासकीय गौरव करण्यात आला आहे.
22 जुलै रोजी राज्यभरात साजरी होणार जयंती
या अधिकृत परिपत्रकानुसार अजित पवार यांची जयंती 22 जुलै रोजी राज्यभरात साजरी केली जाईल. या दिवशी मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले जाईल.
(नक्की वाचा: Supriya Sule: सुप्रिया सुळेंच्या एका संकेताने बदलणार देशाचे राजकारण? मोदी सरकारसमोर ठेवली 'ही' अट)
हा निर्णय केवळ शासकीय कार्यालयांपुरता मर्यादित नसून राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांनाही लागू करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व शैक्षणिक संस्थांमध्येही विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला जाईल. विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या कार्यक्षेत्रात या कार्यक्रमाचे योग्य नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शेअर केली पोस्ट
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटलंय की, "महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या एका महत्त्वपूर्ण निर्णयानुसार आदरणीय अजितदादा यांच्या जयंतीचा सन 2026 पासून राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये समावेश करण्यात आला आहे. हा केवळ शासन निर्णय नसून महाराष्ट्राच्या विकासासाठी आयुष्यभर झटलेल्या, लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या आणि विकासाला नवी दिशा देणाऱ्या दादांच्या कार्याचा राज्याने केलेला अधिकृत गौरव आहे.
दादांनी प्रशासनात कार्यक्षमतेचा नवा आदर्श निर्माण करत पायाभूत सुविधा, सिंचन, उद्योग, शिक्षण, क्रीडा, ग्रामीण विकास आणि जनकल्याणाच्या प्रत्येक क्षेत्रात दूरदृष्टीने काम केले. आपल्या कर्तृत्व, निर्णयक्षम नेतृत्व आणि लोकाभिमुख कार्यशैलीमुळे त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा भक्कम पाया रचला. म्हणूनच ते जनतेच्या मनात केवळ एक नेता नव्हते, तर प्रत्येकाच्या हक्काचे 'दादा' होते.
यापुढे दरवर्षी २२ जुलै रोजी शासकीय स्तरावर त्यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात येणार आहे. दादांच्या लोकसेवेचा, विकासदृष्टीचा आणि जनतेप्रती असलेल्या समर्पणाचा हा सन्मान संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा क्षण आहे.
आदरणीय अजितदादांचे विचार, कार्य आणि विकासाचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. आदरणीय अजितदादांना विनम्र मानवंदना!"