योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Ajit Pawar Plane Crash: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातामधील मृत्यू प्रकरणाला आता नवे वळण मिळालं आहे. या अपघाताबाबत अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी बुधवारी 18 फेब्रुवारी 2026 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या अपघाताबाबत अनेक धक्कादायक दावे केले आहेत. हा केवळ अपघात नसून त्यामागे मोठे कटकारस्थान असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. रोहित पवार यांच्या या वक्तव्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी 'NDTV मराठी' शी बोलताना या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी पुन्हा एकदा केली आहे.
अमोल मिटकरींची मागणी काय?
रोहित पवार यांच्या दाव्यांनंतर आमदार अमोल मिटकरी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली भूमिका मांडली. मिटकरी यांनी म्हटले आहे की, डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी यांच्यातील आर्थिक संबंध आणि विमान कंपनीचा मालक रोहित सिंग याच्यावर असलेला राजकीय वरदहस्त या बाबी अत्यंत गंभीर आहेत. त्यांनी या प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या सीबीआय चौकशीच्या मागणीचे समर्थन केले.
मिटकरी यांनी खंत व्यक्त करताना सांगितले की, त्यांनी 8 दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र दिले होते, परंतु एका सामान्य माणसाची मागणी म्हणून कदाचित त्याकडे दुर्लक्ष झाले असावे. मात्र आता सत्तेत नसतानाही रोहित पवार यांनी जे मुद्दे मांडले आहेत, त्यावर तातडीने अंमलबजावणी होणे महाराष्ट्र हिताचे ठरेल.
( नक्की वाचा : Ajit Pawar Death: अजित पवारांच्या विमानात सुसाईड बॉम्ब? 50 कोटींचा विमा आणि... आजवरचा सर्वात मोठा आरोप )
ब्लॅक बॉक्स डेटा आणि तांत्रिक संशय
अमोल मिटकरी यांनी या विषयावर 'NDTV मराठी' बोलताना अपघातातील तांत्रिक पुराव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. विमान अपघातानंतर 17 दिवसांनी ब्लॅक बॉक्स जळाल्याचे सांगण्यात येत आहे, यावर त्यांनी संशय व्यक्त केला. समुद्रात खोलवर पडूनही किंवा प्रचंड उष्णतेतही ब्लॅक बॉक्समधील डेटा सुरक्षित राहू शकतो, असे सांगत त्यांनी हा डेटा रिकव्हर करण्याची मागणी केली आहे.
याशिवाय पायलट साहिल आणि यश यांच्या हालचालींची चौकशी व्हावी आणि संबंधित ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
( नक्की वाचा : Ajit Pawar Death: 'विठ्ठलाशी आयुष्यभर भांडण राहील'; अमोल मिटकरींचे अजित पवारांसाठी काळीज पिळवटून टाकणारं पत्र )
वेळेच्या गणितावर प्रश्नचिन्ह
या प्रकरणातील वेळेच्या नोंदींबाबतही मिटकरी यांनी शंका उपस्थित केल्या आहेत. अजित पवार हे देवगिरी बंगला आणि बारामती येथून नेमके किती वाजता निघाले आणि घटनास्थळी किती वाजता पोहोचले, याची अचूक वेळ जाहीर व्हायला हवी. त्यांनी विमानात नेमका प्रवेश कधी केला, याची माहिती प्रशासनाने उघड करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. या संवेदनशील प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी जनतेने आता आवाज उठवावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world