Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनावरुन सध्या संशय व्यक्त केला जात आहे. आमदार रोहित पवार यांच्याकडून अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले जात आहेत. अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी रोहित पवार यांनी व्हिएसआर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोप केला जात होता. अशातच याप्रकरणी आता रोहित पवार यांनी आणखी एक सर्वात मोठी अन् महत्वाची अपडेट दिली आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
"स्व.अजित दादांच्या अपघातातील विमानाच्या चौकशीच्या निमित्ताने रोहित सिंगला काल पायलट म्हणून चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती मिळत असून काल रोहित सिंग देशात आला होता. तसेच VSR कडे विमानाच्या ५००० तासांपैकी केवळ १८०० ते २००० तासांचा रेकॉर्ड उपलब्ध असून उर्वरित ३००० तासांचे रेकॉर्डस उपलब्धच नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे," असा धक्कादायक खुलासा रोहित पवार यांनी केला आहे.
"महाराष्ट्राचा लोकनेता गेला असताना अपघाताला जबाबदार कंपनीच्या मालकाला केवळ पायलट म्हणून चौकशीसाठी बोलावले जात असेल तर याचा अर्थ काय घ्यायचा ? दादांच्या अपघाताच्या गुन्हेगारी अँगलची चौकशी CID करत असताना VSR चा मालक भारतात आला असेल तर DGCA ने CID ला कळवणे आवश्यक का समजले नाही?" असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
"DGCA आणि VSR ची मिलीभगत
तसेच "DGCA आणि VSR ची मिलीभगत, यंत्रणांचा एकमेकांशी असलेला विसंवाद बघता, अजित दादांची यांच्या लेखी किती किंमत आहे हे कळून चुकले.. केंद्र आणि राज्य सरकार थोडे गांभीर्य दाखवेल ही अपेक्षा आहे," असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अजित पवार यांच्या निधनावर शोकप्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी रोहित पवार भावुक झाल्याचं पाहायला मिळाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world