जाहिरात

Akola News: अकोला मनपामध्ये मित्रपक्षांतच 'ठिणगी'! स्थायी समिती बैठकीत भाजप-शिवसेना आमनेसामने

अकोला महानगरपालिकेत सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्ष शिवसेनेच्या नगरसेवकांमध्येच वादाची ठिणगी पडली आहे. स्थायी समितीच्या बैठकीत औषध कंत्राट आणि कर्मचारी नियुक्तीवरून जोरदार राडा झाला.

Akola News: अकोला मनपामध्ये मित्रपक्षांतच 'ठिणगी'! स्थायी समिती बैठकीत भाजप-शिवसेना आमनेसामने

योगेश शिरसाट, अकोला 

अकोला महानगरपालिकेत राजकारणाने नवे वळण घेतले आहे. एकीकडे विरोधकांनी महापालिकेबाहेर आंदोलन छेडलेले असताना, दुसरीकडे स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी भाजप आणि मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये जोरदार राडा झाला. कंत्राट वाटप आणि कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरून रंगलेल्या या वादात अखेर एका नगरसेवकाला सभागृहाबाहेर काढण्याची वेळ आली.

महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेचा निषेध करत विरोधकांनी सोमवारी आंदोलन छेडलं होतं. या आंदोलनामुळे आधीच वातावरण तापलेलं असताना, त्यानंतर पार पडलेली स्थायी समितीची बैठक मात्र वेगळ्याच कारणामुळे गाजली. सत्ताधारी भाजप आणि राज्यातील मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगरसेवकांमध्येच जोरदार शाब्दिक वाद रंगला. त्यामुळे मित्रपक्षांमधील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आले.

महानगरपालिकेत गेल्या  15 वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याच्या प्रस्तावावरून वादाची सुरुवात झाली. या प्रस्तावावर काही नगरसेवकांनी आक्षेप घेतल्याने चर्चेला उधाण आले. प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत विरोधी भूमिका घेण्यात आली. त्यामुळे सभागृहात वातावरण हळूहळू तापू लागलं.

औषध कंत्राटावरून आरोप-प्रत्यारोप

महापालिकेच्या दवाखान्यांसाठी औषध पुरवठा कंत्राटाच्या मुद्द्यावरून वाद आणखी तीव्र झाला. या कंत्राट प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत शिवसेनेचे नगरसेवक सागर भारुका यांनी विरोध दर्शवला. यावरून स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल आणि भारुका यांच्यात थेट शाब्दिक चकमक झाली. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप करत वातावरण अधिकच ताणले गेले. 

वाद वाढताच सभागृहात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी होत असल्याने कामकाज काही काळ ठप्प झालं. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात घेऊन अखेर सागर भारुका यांना सभागृहातून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या कारवाईमुळे बैठकीत याचे पडसाद उमटले. 

(नक्की वाचा-  Badlapur News: आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला संविधान चौक तोडफोडीचा प्रयत्न; महिलेला अटक)

भारुका यांचा आक्रमक पवित्रा

सभागृहाबाहेर आल्यानंतर सागर भारुका यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले. मनमानी पद्धतीने कंत्राटे दिली जात असल्याचा दावा करत त्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला. संबंधित औषध पुरवठा कंत्राटावर स्थगिती आणण्यासाठी आपण लढा कायम ठेवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. पुढील काळात या मुद्द्यावरून आंदोलन तीव्र करण्याचे संकेतही त्यांनी दिले. दरम्यान, स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल यांनी सर्व प्रक्रिया नियमांनुसार होत असल्याचे स्पष्ट केले. विकासकामे सुरळीत ठेवण्यासाठीच निर्णय घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले. विरोधकांकडून राजकारण केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. या घटनेनंतर अकोला महानगरपालिकेत सत्ताधारी आणि मित्रपक्षांमधील तणाव उघड झाला असून, येत्या काळात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com