योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : मालेगावनंतर आता अकोल्यात 'टिपू सुलतान'वरुन राजकीय रणकंदन सुरू झाले असून महापालिकेच्या सभागृह नामांतराचा मुद्दा आता चांगलाच तापला आहे. मालेगाव महापालिकेतील ताज्या घडामोडींचे पडसाद अकोल्यात उमटले असून 2012 मध्ये देण्यात आलेल्या टिपू सुलतानच्या नावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. विशेष म्हणजे या राजकीय वादात एमआयएमने गांधीगिरीचा मार्ग स्वीकारल्याने या प्रकरणाला आता एक वेगळी कलाटणी मिळाली आहे.
सभागृह नेत्याच्या कार्यालयाबाहेरून वादाला सुरुवात
अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहाला 2012 मध्ये टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले होते. मात्र दोन दिवसांपूर्वी भाजपचे नगरसेवक पवन महल्ले यांची सभागृह नेता म्हणून निवड झाल्यानंतर एका नवीन वादाला तोंड फुटले. त्यांच्या कार्यालयाबाहेर 'छत्रपती संभाजी महाराज सभागृह नेता' असा बॅनर लावण्यात आला.
या बॅनरमुळे जुन्या नामांतराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या नावावरून सुरू झालेल्या या राजकारणामुळे मनपा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
( नक्की वाचा : Akola News: उंचीच्या आकड्यांना प्रेमाची चपराक! अकोल्यात पार पडलं असं लग्न, ज्याची गोष्ट ऐकून डोळ्यात येईल पाणी )
शिवसेनेची नवी मागणी आणि भाजपची भूमिका
या वादात आता शिवसेना शिंदे गटानेही उडी घेतली आहे. महानगरप्रमुख राजेश मिश्रा यांनी महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांची भेट घेऊन एक निवेदन सादर केले. टिपू सुलतानऐवजी या सभागृहाला ए.पी.जे. अब्दुल कलाम किंवा छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे भाजपचे माजी महापौर विजय अग्रवाल यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 2012 मध्ये दिलेले नाव हे प्रशासनाच्या अधीन नसून, प्रशासनाने स्वतःहून म्हणजेच 'सुमोटो' कारवाई करून ते रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. नामांतराचा कोणताही निर्णय हा सर्वपक्षीय चर्चेनंतरच व्हावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
एमआयएमची गांधीगिरी आणि शांततेचे आवाहन
राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या या गदारोळात एमआयएमने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही वादात न पडता 'गांधीगिरी'चा मार्ग अवलंबला. त्यांनी दोन्ही बाजूंच्या बॅनरना हार घालून जयघोष केला आणि शहरात शांतता राखण्याचे आवाहन केले.
शहरात सामाजिक सलोखा आणि ऐक्य टिकवून ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांच्या नावावरून समाजात मतभेद निर्माण करणे योग्य नाही, असं मत एमआयएमचे पदाधिकारी आसिफ खान यांनी यावेळी व्यक्त केलं. त्यांच्या या अनोख्या कृतीची सध्या अकोल्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
( नक्की वाचा : कोण होता Tipu Sultan? ज्याच्या दहशतीमुळे आजही एक संपूर्ण समुदाय दिवाळीत पाळतो सूतक, वाचा हा इतिहास )
पुढील निर्णयाकडे शहराचे लक्ष
नामांतराच्या या मुद्द्यावरून अकोला महानगरपालिकेत येणाऱ्या काळात मोठे राजकीय नाट्य घडण्याची शक्यता आहे. विविध पक्षांनी आपापली भूमिका स्पष्ट केल्यामुळे प्रशासनावर दबाव वाढत आहे. आता महापालिका प्रशासन या वादावर काय तोडगा काढते आणि सभागृहाचे नाव कायम राहते की बदलले जाते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. येत्या महापालिका बैठकीत या विषयावर जोरदार खडाजंगी होण्याची चिन्हे दिसत आहेत.