जाहिरात

Akola News : अकोल्यात नवा 'गेम' होणार? इंद्रनील नाईक आणि बाजोरियांच्या भेटीने भाजपाची धाकधूक वाढली!

Akola Municipal Election 2026: अकोला महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठा पेच निर्माण झाला आहे.

Akola News : अकोल्यात नवा 'गेम' होणार? इंद्रनील नाईक आणि बाजोरियांच्या भेटीने भाजपाची धाकधूक वाढली!
Akola Municipal Election 2026 एकीकडे भाजपसोबतची बैठक फिसकटल्यानंतर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे.
अकोला:

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola Municipal Election 2026: अकोला महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठा पेच निर्माण झाला आहे. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जागांच्या संख्येवरून एकमत होत नसल्याने अकोल्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विशेष म्हणजे आज (शनिवार, 27 डिसेंबर) झालेल्या बैठकीत कोणताही ठोस निर्णय होऊ शकला नसल्याने महायुतीमधील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर आले आहेत.

जागावाटपाचा तिढा 

अकोला महापालिकेच्या रणांगणात उतरण्यासाठी महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची शनिवारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपाच्या सूत्रावर चर्चा करण्यात आली. सुरुवातीला भाजप 55 जागा, शिवसेना 15 जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस 10 जागा अशा फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू होती. 

मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रस्तावावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. 10 जागांचा आकडा आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी घेतल्यामुळे ही बैठक निष्फळ ठरली. यामुळे निवडणुकीच्या अगदी तोंडावर महायुतीसमोर जागावाटपाचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

( नक्की वाचा : Akola News : सत्तेची नशा उतरवली! एका सहीने अख्खी ग्रामपंचायत घरी धाडली, काय आहे प्रकरण? )
 

नव्या समीकरणांची नांदी आणि गुप्त भेटीगाठी

एकीकडे भाजपसोबतची बैठक फिसकटल्यानंतर राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी तातडीने आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी थेट शिवसेनेचे नेते गोपीकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. 

या दोन नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपला बाजूला सारून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने 50-50 फॉर्म्युल्यावर एकत्र निवडणूक लढवण्याबाबत प्राथमिक चर्चा केल्याचे समजते. मात्र, दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी अशा कोणत्याही अधिकृत निर्णयाचा सध्या तरी इन्कार केला आहे.

( नक्की वाचा : Akola News : अकोल्यातील बहुचर्चित दंगल प्रकरणात 14 वर्षांनी 59 जणांना मिळाला न्याय; कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय )

नेत्यांची भूमिका आणि कार्यकर्त्यांमधील संभ्रम

या संपूर्ण प्रकरणावर राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार अमोल मिटकरी आणि शिवसेना नेते गोपीकिशन बाजोरिया यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महायुतीमधील अंतिम निर्णय अद्याप झालेला नसून चर्चांचे फेरे सुरूच असल्याचे त्यांनी सांगितले. असे असले तरी जागावाटपाचा तिढा न सुटल्यास अकोल्यात मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळू शकते किंवा दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे आपली रणनीती आखू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अनिश्चिततेमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये सध्या संभ्रमाचे वातावरण असून, वरिष्ठांच्या निर्णयाकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

येणाऱ्या 24 तासांत मोठ्या निर्णयाची शक्यता

अकोला महानगरपालिकेचे राजकीय समीकरण पुढील काही तासांत कोणते वळण घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जर जागावाटपावर तोडगा निघाला नाही, तर महायुतीमधील घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकण्याची चिन्हे आहेत. या राजकीय संघर्षाचा फायदा कोणाला होणार आणि महायुती आपले अस्तित्व टिकवून ठेवणार का, याचे उत्तर लवकरच स्पष्ट होईल. सध्या तरी अकोल्याच्या राजकीय नकाशावर मोठ्या बदलाचे संकेत मिळत आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com