योगेश शिरसाट, प्रतिनिधी
Akola News : अकोल्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) युवक-विद्यार्थी आघाडीचे अकोला महानगरप्रमुख वैभव घुगे यांनी आत्महत्या केलीय. त्यांच्या आत्महत्येनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जुन्या आरटीओ रोडजवळील रेल्वे ट्रॅकवर धावत्या ट्रेनसमोर उडी मारून त्यांनी स्वत:चं आयुष्य संपवलं. वैभव घुगे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार धनंजय मुंडे यांचे अगदी जवळचे सहकारी म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे त्यांच्या या अचानक निधनाने राजकारणापासून कार्यकर्त्यांपर्यंत शोककळा पसरली आहे. गावोगावी आणि शहरातही या घटनेची चर्चा सुरू आहे.
काय आहे कारण?
अकोला महानगरप्रमुख असलेल्या वैभव घुगे यांनी इतका टोकाचा निर्णय नेमका का घेतला? हा प्रश्न सध्या सर्वांच्या मनात आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ते कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
( नक्की वाचा : Akola News : गुंतवणुकीचे आमिष दाखवत कोट्यवधींची फसवणूक; सायबर गुन्ह्यांमधील 'नागपूर मॉडेल' उद्ध्वस्त )
गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक ताणात होते का, कुणाशी त्यांचे वाद झाले होते का, किंवा आर्थिक अडचणी किती मोठ्या स्वरूपाच्या होत्या, या सर्व बाबींचा तपास करणे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या निधनाने विद्यार्थी आघाडीमध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचा सूर कार्यकर्त्यांतून उमटत आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे ट्रॅकवरून वैभव घुगे यांचा मृतदेह खाली उतरवून तो शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. वैभव यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने रुग्णालयात पोहोचले आहेत.
( नक्की वाचा : Akola News : स्पर्धा परीक्षांसाठी राहते घर मोफत; एका वकिलामुळे दानापूरमधील 27 विद्यार्थी बनले सरकारी अधिकारी )
पोलिस आता त्यांच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स, त्यांचे आर्थिक व्यवहार आणि इतर वैयक्तिक कारणांचा सखोल तपास करत आहेत. वैभव घुगेंच्या या आकस्मिक निधनाने अकोल्याच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणात मोठी पोकळी आणि हळहळ निर्माण झाली आहे.
| Helplines | |
|---|---|
| Vandrevala Foundation for Mental Health | 9999666555 or help@vandrevalafoundation.com |
| TISS iCall | 022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm) |
| (If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.) | |